प्रतिनिधी / कुरुंदवाड
यंदा उद्या रविवार दिनांक 29 नोव्हेंबर व सोमवार दिनांक 30 नोव्हेंबर दोन दिवस कृतिका नक्षत्र वरील कार्तिक पौर्णिमा योग आल्याने येथील कृष्णा-पंचगंगा संगम कुरुंदवाड घाटावर असलेल्या सुब्रमण्यम महादेव मंदिरातील कार्तिक स्वामींचे दर्शनाचा योग आला आहे. येथील कार्तिकस्वामी मंदिरात बारमाही दर्शन खुले असते मात्र स्त्रियांसाठी कृतिका नक्षत्रावर येणाऱ्या कार्तिक पौर्णिमेला दर्शनाचा लाभ घेणे लाभदायक मानले जाते. यामुळे येथील कार्तिक स्वामी मंदिर स्त्रिया तसेच सर्वांसाठी रविवार दिनांक 29 नोव्हेंबर ते संकष्टी पर्यंत म्हणजेच गुरुवार दिनांक 3 डिसेंबर अखेर हे मंदिर सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले राहणार असल्याची माहिती श्री सुब्रमण्यम महादेव देवस्थान घाट व्यवस्थापक मंडळाने दिली आहे.
सध्या कोविड १९ चा प्रादुर्भाव असल्यामुळे शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून सोशल डिस्टंसिंग सॅनीटायझरचा वापर करून दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी ठीकठिकाणी सूचना फलक लावण्यात आले असून, मंदिराची स्वच्छता करण्यात आले असून रंगरंगोटी ही करण्यात आले आहे. त्याचबरोबर मंदिराबाहेर मंडप तसेच दर्शन रांग व्यवस्था करण्यात आली आहे. तरी दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांनी मास्कचा वापर करून येथील नियमानुसारच व शासन नियमानुसार दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन या मंदिराचे मुख्य पुजारी जयंत हूद्दार यांनी केले आहे.









