प्रतिनिधी/कुरुंदवाड
सध्या कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी कुरुंदवाड शहर लॉकडाऊन केले आहे. या पार्श्वभूमीवर गरीब गरजू लोकांना जेवण मिळावे या उद्देशाने येथील शिवसेना महिला शहराध्यक्ष वैशाली जुगळे यांनी कुरुंदवाड नगरपालिका क्षेत्रात शिवभोजन थाळीसाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. या अनुषंगाने कुरुंदवाड शहरात प्रथमच शिवभोजन थाळीसाठी परवानगी दिली आहे.
बुधवारी या शिवभोजन थाळीचा शुभारंभ करण्यात आला. दररोज 75 शिवभोजन थाळीला येथे परवानगी देण्यात आली आहे. याचा लाभ घेणाऱ्यांची ऑनलाईन मोबाईल ॲप वर नोंद केली जाणार आहे. यासाठी त्या लाभार्थीचा फोटो घेतला जाणार आहे. तसेच मोबाईल नंबर आधार कार्ड नंबर ही अपलोड केला जाणार आहे. सध्या कोरोनाचे संकट असल्यामुळे शिवभोजन थाळी 5 रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या शिवभोजन थाळी शुभारंभ प्रसंगी शिवसेना महिला जिल्हा संघटिका मंगल चव्हाण, माजी नगराध्यक्ष वैभव उगळे, एकनाथ चव्हाण, केदार जुगळे, सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब सावगावे, तसेच लाभार्थी चंद्रकांत कुंभार संतोष कोकाटे मालन कोकाटे आदी उपस्थित होते
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या शिवभोजन थाळी योजना कुरुंदवाड मध्ये सुरु व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. अखेर आजच्या या कोरोना संकटाच्या आणीबाणीच्या काळात आम्हाला परवानगी मिळाली. यामुळे गरीब गरजू, कामगार यांना या माध्यमातून जेवण देणे त्या सामाजिक कामाचा एकात्मिक आनंद मिळणार आहे. यासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे तसेच मुख्यमंत्री ठाकरे यांचे आभार मानतो –वैशाली जुगळे, शिवभोजन थाळी संयोजिका कुरुंदवाड
Previous Articleउत्तर प्रदेशात कोरोनाचा पहिला बळी
Next Article अमेरिकेत एका दिवसात 912 कोरोना बळी








