कुरुंदवाड/प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या लोकशाही विघातक नागरी तत्त्व कायद्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कुरुंदवाड बंदची हाक दिली होती. या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व व्यवहार सकाळपासून बंद होते. तर, हॉटेल्स, व्यापारी दुकाने, भाजीमंडी आधी परिसरात या बंदमुळे कुरुंदवाड बाजारपेठ नो बाग रोड आंबेडकर चौक आधी परिसरात शुकशुकाट होता. तसेच कुरुंदवाड परिसरातील मजरेवाडी हेरवाड, बस्तवाड, भैरवाडी, औरवाड, आलास सह परिसरात सर्व व्यवहार बंद ठेवून वंचित बहुजन आघाडीच्या बंदला पाठिंबा दिला होता.
दरम्यान या बंदमुळे कुरुंदवाड बस आगाराने जयसिंगपूर सांगली वगळता हुपरी–कागल– इचलकरंजी आदी मार्गावरील बससेवा बंद ठेवली होती. या बंद निमित्य वंचित बहुजन आघाडी व विविध संघटनांच्या वतीने भारत माता की जय, वंदे मातरम, हिटलर सरकार चले जाव अशा घोषणा देत कुरुंदवाड शहरात केंद्र सरकार विरोधात निषेध रॅली काढण्यात आली. या रॅलीची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली. ही रॅली संपूर्ण शहरांमध्ये शहरातील प्रमुख मार्गावरून निषेधाच्या घोषणा देत डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ आल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब नदाब यांनी केंद्र सरकारचा निषेध केला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक विलास कांबळे, अनिरुद्ध कांबळे, ममतेश आवळे, लियाकत बागवान, महावीर आवळे यांनी मनोगत व्यक्त केली. या रॅलीत शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.