माजी विद्यार्थी, एसडीएमसी सदस्य, शिक्षणप्रेमींचे सहकार्य : शाळेच्या सौंदर्यात भर ; विद्यार्थ्यांमध्ये उत्साह
प्रतिनिधी / बेळगाव
ग्रामीण भागातील सरकारी शाळा म्हणजे दुर्लक्षित, गळती व जीर्ण झालेल्या असे चित्र असते. मात्र, याला छेद देत कुरिहाळ येथील प्राथमिक मराठी शाळेचा कायापालट झाला आहे. या कामासाठी शाळेतील शिक्षकांनी अपार कष्ट घेतले आहेत. शिवाय एसडीएमसी कमिटी, शिक्षणप्रेमी, माजी विद्यार्थी, दानशूर व्यक्तींच्या पुढाकाराने शाळेचा चेहरामोहरा बदलला आहे. त्यामुळे परिसरातील इतर शाळांना ही शाळा आता आदर्श ठरत आहे.
कोरोना काळात या शाळेतील शिक्षकांनी वेळ वाया न घालविता शाळेच्या विकासासाठी व सुशोभिकरणासाठी परिश्रम घेतले आहेत. त्यामुळे शाळा आज इतर शाळांसाठी आदर्श ठरत आहे.
संरक्षक भिंतीवर राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा
नैसर्गिकरीत्या डोंगरकुशीत वसलेल्या या छोटय़ाशा गावातील या छोटेखानी शाळेला रंगरंगोटी करून विविध सुविधा पुरविल्या असून विद्यार्थ्यांना साद घालत आहे. शाळेच्या इमारतीला रंगरंगोटी करून आकर्षित बनविण्यात आले आहे. लहानपणीच विद्यार्थ्यांच्या मनात शाळेविषयी प्रेम, आपुलकी निर्माण व्हावी, याकरिता शाळेसभोवती असलेल्या संरक्षक भिंतीवर विविध राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा, सैनिकांचे शौर्य, कारगिल दिवस, अंधश्रद्धा निर्मूलन आदी चित्रे हुबेहूब रेखाटली आहेत. शिवाय निसर्गाविषयी प्रेम वाढावे, याकरिता विविध पक्ष्यांची चित्र रेखाटली आहेत. प्रवेशद्वाराला रंग लावल्याने शाळेच्या सौंदर्यात भर पडत आहे. शाळेतील अंतर्गत वर्गखोल्यांनादेखील रंग लावून कपाट, फळा यासह इतर बाबींचा विकास साधण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना प्रार्थनेसाठी थांबविण्यात येणाऱया व्यासपीठावर पेव्हर्स बसविण्यात आले आहेत.
शाळेसमोर छोटेखानी सुंदर मैदान आहे. त्यामुळे विद्यार्थी शारीरिकदृष्टय़ा सक्षम होताना दिसत आहेत. चार वर्षांपूर्वी शाळेचा सुवर्णमहोत्सव कार्यक्रम झाला. या कार्यक्रमातील शिल्लक रक्कमदेखील शाळेच्या विकासासाठी खर्ची घालण्यात आली आहे. शिवाय शासनाकडून 8 लाखांचे अनुदान आले होते. तो निधीही विकासासाठी खर्च करण्यात आला आहे. राजगोळी येथील हेमरस साखर कारखान्यामार्फत शाळेसाठी मुला-मुलींना स्वतंत्र शौचालयांची व्यवस्था करून दिली आहे.
शाळेत बोअरवेलची सुविधा
शाळेतील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी बोअरवेल खोदाई करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना 24 तास शुद्ध पाणी उपलब्ध होते. शिवाय शाळेच्या आवारात छोटेखानी, बगीच्या फुलविण्यात आला आहे, यासाठीही या पाण्याचा विशेष वापर होत आहे.
शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये उत्साह
सध्या सहावी व सातवीचे वर्ग सुरू असले तरी शाळा आकर्षित झाल्याने शिक्षकांसह विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. त्यामुळे शाळेचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यास मदत होणार आहे.
शासनाकडून मिळणाऱया योजना
शासनाकडून मिळणाऱया क्षीरभाग्य योजना, मध्यान्ह आहार योजना, मोफत गणवेश, पाठय़पुस्तके, शूज, सॉक्स, शिष्यवृत्ती, आरोग्य तपासणी, पालक मेळावा, शैक्षणिक सहल आदी कार्यक्रम राबविले जातात. सुरेश अष्टगी (मुख्याध्यापक) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा ओढा मराठी शाळेकडे वाढला पाहिजे, यासाठी विकास साधण्यात आला आहे. सरकारी अनुदान, देणगीदार, शिक्षणप्रेमी, माजी विद्यार्थी यांच्या सहकार्यातून शाळेचा कायापालट झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. शिवाय येत्या काळात स्मार्ट क्लासरुम सुरू करण्याचा मानस आहे.









