पाऊण लाखाची चांदी, आहेराचे कपडे लंपास
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव शहर व उपनगरांमध्ये चोऱया, घरफोडय़ा सुरूच आहेत. कुमारस्वामी लेआऊट परिसरातील केवळ 15 दिवसांपूर्वी वास्तूशांती झालेल्या घराचा कडीकोयंडा तोडून पाऊण लाखाची चांदी व आहेराचे कपडे चोरटय़ांनी पळविले आहेत. रविवारी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला आहे.
एपीएमसी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. मल्लिकार्जुन बसवराज गणाचारी यांनी फिर्याद दिली असून केवळ 15 दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या नवीन घराची वास्तुशांती केली आहे. घराला कुलूप लावून ते नेसरी येथील सासरी गेले होते. मल्लिकार्जुन यांच्या घराशेजारीच त्यांच्या बहिणीचे घर आहे. चोरटय़ांनी कडीकोयंडा तोडून वास्तुशांतीसाठी पूजेत वापरलेली 1 हजार 180 ग्रॅम चांदीची भांडी व आहेरापोटी आलेले कपडे, साडय़ा असा एकूण 79 हजार रुपये किमतीचा ऐवज पळविला आहे. एपीएमसी पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी पुढील तपास करीत आहेत.









