प्रतिनिधी / कारवार
जिल्हय़ातील कुमठा नगरसभेच्या बुधवारी झालेल्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली. अध्यक्षपदी अत्यंत मागासलेल्या हालक्की समाजातील मोहिनी गौडा यांची निवड झाली तर उपाध्यक्षपदी नगरसभेवर तीन वेळा निवडून आलेले राजेश पै यांची निवड झाली. दीड-दोन वर्षापूर्वी कुमठा नगरसभेच्या निवडणुकीत 23 पैकी 17 जागांवर भाजपचे, 5 जागांवर काँग्रेसचे आणि एक जागेवर निजदचा उमेदवार निवडून आला होता. निवडून आलेल्या एका उमेदवाराचे यापूर्वीच निधन झाले आहे. निवडून आलेल्या निजदच्या एकमेव उमेदवारानेही भाजपलाच समर्थन देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नगरसभेच्या अध्यक्षपदी मोहिनी गौडा आणि उपाध्यक्षपदी राजेश पै निवडून येण्यात कोणतीच अडचण निर्माण झाली नाही.
हल्याळ नगरपंचायत काँग्रेसच्या ताब्यात
दरम्यान, हल्याळ नगरपंचायतीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले. हल्याळ नगरपंचातीच्या अध्यक्षपदी अझरुद्दीन बसरीकट्टी आणि उपाध्यक्षपदी सुवर्णा सुंदर मादर यांची निवड करण्यात आली. अझरुद्दीन यांनी भाजपचे चंद्रकांत कम्मार यांच्यावर मात केली तर सुवर्णा यांनी भाजपच्याच शांता हेरेकर यांच्यावर मात केली.
हल्याळ नगरपंचायतीच्या सदस्यांची संख्या 23 इतकी आहे. यापैकी काँग्रेसचे 14, भाजपचे सात आणि निजद व अपक्ष प्रत्येकी एक उमेदवार निवडून आले होते. काँग्रेस उमेदवाराला निजद आणि अपक्ष उमेदवारांचेही समर्थन मिळाले. माजी मंत्री आणि हल्याळचे आमदार आर. व्ही. देशपांडे यांनीही काँग्रेस उमेदवाराला समर्थन दिले. त्यामुळे हल्याळ नगरपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा रोवण्यात काँग्रेसला सहजशक्मय झाले. हल्याळ नगरपंचायत पदाधिकाऱयांच्या निवडणुकीवर आर. व्ही. देशपांडे आणि विधान परिषद सदस्य बारीक नजर ठेवून होते.
मुंदगोड नगरपंचायत भाजपकडे
यल्लापूर विधानसभा मतदारसंघात समावेश होत असलेल्या मुंदगोड नगरपंचायत पदाधिकारी निवडणुकीत भाजपने बाजी मारली. अध्यक्षपदी रेणुका रवी हावेरी आणि उपाध्यक्षपदी मंजुनाथ हरमलकर यांची अविरोध निवड झाली. अध्यक्षपद अनसूचित जाती (महिला) साठी राखीव ठेवले होते. तर उपाध्यक्षपद सामान्य गटासाठी राखीव होते.
मुंदगोड नगरपंचायतीवर रेणुका हावेरी ही अनुसूचित जातीतील महिला निवडून आली होती. परिणामी रेणुका यांच्याशी लढत देण्यासाठी काँग्रेसकडे उमेदवारच नव्हता. त्यामुळे रेणुका यांची अध्यक्षपदी अविरोध निवड झाली. उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसतर्फे बीबीजान मल्लनावर यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज अंतिम क्षणी पाठीमागे घेतला. त्यामुळे उपाध्यक्षपदी मंजुनाथ हरमलकरही अविरोध निवडून आले. जिल्हा पालकमंत्री शिवराम हेब्बार मुंदगोड नगरपंचायतीच्या निवडणुकीवर बारीक नजर ठेवून होते.









