सर्वाधिक कुपोषित बालकांची संख्या महाराष्ट्रात
ऑनलाईन टीम / नवी मुंबई
कोरोना संसर्गस्थिती काहीशी निवळल्याने महाराष्ट्रासह देशातील नागरिकांचे जीवन पुर्वपदावर येत आहे. यामुळे नागरिक दसरा, दिपावली, ईद सारखे सण साजरे करत आहेत. मात्र माहितीच्या अधिकाराखाली समोर आलेल्या आकडेवारीत धक्कादायकबाब समोर आली आहे. या मिळालेल्या माहितीनुसार कुपोषणाचा विळखा महाराष्ट्राभोवती आणखी घट्ट होत असुन कुपोषित बालकांच्या संख्येत महाराष्ट्र राज्य हे देशात पहिल्या स्थानावर असल्याची लाजिरवाणीबाब समोर आली आहे. महाराष्ट्रात कुपोषणग्रस्त बालक ६ लाख १६ हजार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
देशात गरीबी आणि अन्य कारणांमुळे लहान वयात मुलांना आणि मातेला योग्य आहार न मिळाल्याच्या समस्या उद्भवत आहे. गरीबीमुळे लाखो मुलांना आणि मातेलाही पोषक आहार मिळत नसल्यानं जन्मतः कुपोषणाची शिकार ठरणाऱ्या बालकांचं प्रमाण मोठं आहे. याबाबतीत नुकतीच माहितीच्या अधिकाराखाली ही परिस्थिती गंभीर असल्याचं समोर आलं आहे. त्याहूनही गंभीर म्हणजे सर्वाधिक कुपोषित बालकांची संख्या महाराष्ट्रात आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राने माहिती अधिकाराखाली विचारण्यात आलेल्या उत्तरातील मिळालेल्या माहितीनुसार, देशात ३३ लाखांहून अधिक कुपोषित बालकं असून, त्यापैकी निम्म्यापेक्षा अधिक मुलं अतिकुपोषित आहेत. महाराष्ट्र, बिहार आणि गुजरात या तीन राज्यांमध्ये कुपोषित बालकांची संख्या सर्वाधिक असून, यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. २०११ मधील जनगणनेनुसार देशात एकूण ४६ कोटीपेक्षा अधिक मुलं आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत अतिकुपोषित बालकांच्या संख्येत तब्बल ९१ टक्के वाढ दिसून आली आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये ही संख्या ९ लाख २७ हजार होती. ती ऑक्टोबर २०२१ पर्यंत १७ लाख ७६ हजार झाली आहे. यामुळे कणखर देशा, राकट देशा, असे वर्णन असणाऱ्या महाराष्ट्रासाठी ही लाजिरवाणीबाब निश्चित असुन यावर राज्य सरकार काही ठोस पावले उचलणार का ? याकडे जनतेचे ही लक्ष असणार आहे.








