कुपवाड / प्रतिनिधी
कुपवाडच्या प्रभाग समिती तीन अंतर्गत येणाऱ्या प्रभाग आठमधील तुळजाईनगर परिसरात अनेक वर्षापासून मूलभूत विकासकामे रखडली आहेत. वारंवार मागणी करूनही नागरी समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या महापालिका प्रशासन आणि नगरसेवकांच्या निषेधार्थ बुधवारी तुळजाईनगर विकास कृती समितीच्यावतीने नागरिकांनी कुपवाड फाटा येथे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले.
यावेळी आंदोलकांनी तुळजाईनगरकडे दुर्लक्ष करणाऱ्या मनपा प्रशासन आणि स्थानिक नगरसेवकांच्या निष्क्रिय कारभारा विरोधात निदर्शने केली. आंदोलनाला माजी आमदार प्रा.शरद पाटील यांनी भेट देऊन पाठींबा व्यक्त केला. आंदोलनाची दखल घेऊन महापौर दिग्विजय सूर्यवंशी, विरोधी पक्षनेते संजय मेंढे, नगरसेवक विष्णू माने, राजेंद्र कुंभार, नगरसेविका कल्पना कोळेकर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याची ग्वाही दिली. समितीचे अध्यक्ष मकरंद कुलकर्णी, प्रकाश पाटील यांसह नागरिकांनी महापौरांना मागण्यांचे लेखी निवेदन दिले.
निवेदनात म्हटले की, कुपवाड फाटा ते माळी मंगल कार्यालय येथून जाणाऱ्या बांधावरील रस्त्याची उंची कमी करून मिळावी, मंगलमूर्ती कॉलनी ते चैत्रबन कॉलनीपर्यंत नाल्याचे खोलगीकरण व अस्तरीकरण करावे, तुळजाईनगरला पाचव्या गल्लीमध्ये तयार झालेला अनधिकृत नाला बंद करावा, अंतर्गत पूर्व पश्चिम गटारी कराव्यात, उर्वरित रस्त्यांचे डांबरीकरण करावे, खुल्या जागा महापालिकेने ताब्यात घेऊन परिसर विकसित करावा, अशा मागण्या करण्यात आल्या.
यावेळी महापौर सुर्यवंशी व नगरसेवक विष्णु माने यांच्याहस्ते सरबत देऊन उपोषण आंदोलन स्थगित करण्यात आले. आंदोलनात समितीचे अध्यक्ष मकरंद कुलकर्णी, प्रकाश पाटील, दत्तात्रय हिरेमठ, श्रीकांत पाटील, उमेश मिधिले, अमित शितोळे, निलेश पाटील, अमित सोनवणे, नंदकुमार पाटील, सचिन वाघमोडे यांसह तुळजाईनगरमधील अन्य नागरिक सहभागी झाले होते.








