एलएसीजवळ एके-47 रायफल, हँडग्रेनेड जप्त
श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. भारतीय लष्कर आणि स्थानिक पोलिसांनी नियंत्रण रेषेजवळ दोन कुख्यात दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. त्यांच्याकडून दोन एके-47 रायफल, दोन पिस्तूल आणि 4 हातबॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चकमकीची ही घटना कुपवाडामधील नियंत्रण रेषेजवळील माछिल भागातील टेकरी नार भागात झाली. चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. मृत दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाच्या माध्यमातून त्यांची ओळख आणि ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. नियंत्रण रेषेजवळील सीमेपलीकडून आलेले दहशतवादी घुसखोरीचा ‘नापाक’ प्रयत्न करत आहेत. याशिवाय स्थानिक दहशतवादीही या भागात दिसत आहेत.
कुपवाडामध्ये यापूर्वीही चकमकीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या वषी जूनमध्ये कुपवाडय़ातील चक्र कंडी भागात दहशतवाद्यांसोबत पोलीस आणि लष्करात चकमक झाली होती. या चकमकीत लष्कर-ए-तोयबा या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेचे 2 दहशतवादी मारले गेले. त्यापैकी एकाची ओळख पाकिस्तानी दहशतवादी तुफैल अशी झाली आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी याला दुजोरा दिला आहे. चकमकीत तुफैलचा खात्मा करणे हे मोठे यश असल्याचे सांगण्यात आले.









