कुपवाड / प्रतिनिधी
कुपवाडमधील सिदार्थनगर भागात राहणाऱ्या सुधाकर चुडाप्पा कांबळे यांच्या राहत्या घराला सोमवारी रात्री आठच्या सुमारास शॉर्टसर्किटने अचानक आग लागली. याबाबत रात्री उशिरापर्यंत कुपवाड पोलिसांत नोंद झाली न्हवती. आगीत कोणतीही जीवीतहानी झाली नाही. मात्र, घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने सुमारे दीड ते दोन लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज घटनास्थळी घर मालकांनी व्यक्त केला आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कुपवाडमधील सुधाकर कांबळे यांचे सिद्धार्थनगर भागात बांधीव राहते घर आहे. या घरात ते पत्नी व एका मुलासोबत राहतात. सोमवारी रात्री आठच्या सुमारास शॉर्ट सर्किटने आग लागली. यावेळी घरातून अचानक धुराचे लोट बाहेर येऊ लागल्याने घटनास्थळी कांबळे व त्यांच्या नातेवाईकांची पळापळ सुरु झाली. बघ्यानीही गर्दी केली.
शेजारील नागरिकांनी महापालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. जवानांनी अथक प्रयत्न करून तासाभरात आग आटोक्यात आणली. तोपर्यंत घरातील संसारोपयोगी साहित्य, मिक्सर, कपडे जळून खाक झाले होते. कौले फुटून अन्य साहित्याचेही नुकसान झाले. घटनास्थळी माजी आमदार प्रा.शरद पाटील, नगरसेवक प्रकाश ढंग यांनी भेट देऊन नुकसानग्रस्तांची विचारपूस केली.








