कुपवाड / प्रतिनिधी
कुपवाड एमआयडीसी लगतच्या दत्तनगर भागातील प्रभूकृपा रबर कारखान्यात मशीनवर काम करत असताना अचानक विजेचा शॉक लागल्याने एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी घडली. याबाबत कुपवाड पोलिसांत नोंद झाली आहे. यामध्ये संतोष दिलीप मराठे (२५,रा.शिवनेरीनगर,कुपवाड) असे कारखान्यात मयत झालेल्या कामगाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत कामगार संतोष मराठे हा दत्तनगर भागातील मालक अनिल विजय आवळे यांच्या मालकीच्या प्रभूकृपा रबर कारखान्यात गेल्या तीन महिन्यापासून मशीनवर कामाला होता. सोमवारी दुपारी मशीनवर काम करत असताना तो अचानक जमीनीवर कोसळला. कंपनी मालक अनिल आवळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन कामगारास उपचारासाठी तातडीने सांगली शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच संतोष मयत असल्याचे घोषित केले. उत्तरीय तपासणी अहवालात शॉक लागून मृत्यू झाल्याची नोंद असल्याचे कुपवाड पोलीसांनी सांगितले. पोलिसांनी पंचनामा केला. अधिक तपास हवालदार घेरडे करीत आहेत.
Previous Articleदोन वर्षासाठी औंधकर सांगली जिल्ह्यातून हद्दपार
Next Article कोल्हापुरात आठवडाभरात 200 जणांना चाचणी लस








