कुपवाड / प्रतिनिधी
कुपवाडमधील बजरंगनगर भागात एका घराशेजारी मोकळ्या जागेत तीन पानी जुगार खेळणाऱ्यांवर बुधवारी रात्री कुपवाड पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी चौघाना अटक केली असून त्यांच्या ताब्यातील जुगारातील रोखड व साहित्यासह २३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक केलेल्यामध्ये चंद्रकांत कल्लाप्पा मोदी (वय २३), सुनिल मारुती खटके (वय २८), तौफिक मुजावर खान (वय २७, तिघेही रा.बजरंगनगर, कुपवाड), अहमद मकसूद खान(वय २६,रा.जकातनाका, कुपवाड) अशी नावे आहेत.
याबाबत माहिती अशी, कुपवाडमधील बजरंगनगर भागात एका घराशेजारी मोकळ्या जागेत तीन पानी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती कुपवाड पोलिसांना मिळाली. त्यानुसार सपोनि नीरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे, तुषार काळेल यांच्या पथकाने तीनपानी जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी अटक केलेले संशयित चौघेजण तीन पानी जुगार खेळताना रंगेहाथ सापडले.यावेळी पोलिसांनी जुगार अड्ड्यातील रोख रक्कमेसह २३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.








