इचलकरंजीच्या दोघा व्यापाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल
कुपवाड / प्रतिनिधी
ओळखीचा गैरफायदा घेऊन इचलकरंजीच्या दोन व्यापाऱ्यांनी संगनमत करून कुपवाड एमआयडीसीतील उद्योजक सतीश मालू यांच्या उमेद टेक्सटाईल कंपनीची तब्बल ९लाख ४२ हजाराची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत कुपवाड पोलिसांत नोंद झाली असून पोलिसांनी याप्रकरणी इचलकरंजी येथील दोन व्यापाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये संशयित रामस्वरुप मदनलाल बोहरा व अंकीत रामस्वरुप बोहरा ( दोघेही रा. राजर्षी शाहू मार्केट, इचलकरंजी) अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत. या दोघांनी ९ लाख रुपये किंमतीच्या कॉटन यार्न (८ एस)च्या ११७ बॅगा नेऊन पैसे न देताच गायब होऊन फसवणूक केल्याची तक्रार उद्योजक सतीश मालू यांनी दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश मालू यांच्या मालकीची कुपवाड एमआयडीसीत उमेद टेक्सटाईल नावाने कंपनी आहे. त्यांच्याशी संशयित इचलकरंजीचे कापड व्यापारी रामस्वरुप बोहरा व अंकीत बोहरा यांनी ओळख बनवली.या ओळखीचा गैरफ़ायदा घेऊन त्या दोघांनी मार्च २०२१ ते १३ जुलै २०२१ या कालावधीत उमेद टेक्सटाईल कंपनीत येऊन कंपनीचे मालक सतीश मालू यांची भेट घेतली. जुनी ओळख सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांनी आमचा व्यवसाय अडचणीत आहे.आम्हाला मदत करा’, अशी विनवनी करून काॅटन यार्न (८ एस) चे गिऱ्हाईक आहे. माल विक्री करुन तुम्हाला पैसे देतो.असे सांगून ११७ बॅगा इचलकरंजी मधील स्वामी समर्थ ट्रान्सपोर्टच्या वाहनातून नेल्या.
यामध्ये त्यांच्या महालक्ष्मी टेक्सकॉम (एच ७१ कोहिनूर कल्पना टाॅकीज जवळ, इचलकरंजी) या कंपनीच्या नावाने ९ लाख ४२ हजार ८८७ रुपयांचा माल नेला. मालाच्या रक्कमेपोटी संशयित अंकीत बोहरा यांनी तीन वेगवेगळ्या रक्कमेचे धनादेश दिले होते. परंतु, धनादेश परत आले होते. मालू यांनी बोहरा यांना रक्कमेची वेळोवेळी मागणी करुनही त्यांनी रक्कम देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे मालू यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे बोहरा यांच्याविरोधात कुपवाड पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. अधिक तपास कुपवाड पोलिस करीत आहेत.