प्रतिनिधी / सातारा :
येथील नवीन एमआयडीसीतील कूपर फाऊंड्री कंपनीच्या आवारातून लोखंडी प्लेटा चोरुन त्या विक्री करणाऱया एका भामटय़ास स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडून चोरीचा माल विकून आलेले 40 हजार रुपयांची रक्कम पोलिसांनी जप्त केली असून हा चोरटा कंपनीतील कामगारच असल्याचे समोर आले आहे.
दि. 22 जून रोजी एमआयडीसीतील कूपर फाऊंड्री कंपनीच्या आवारातून लोखंडी प्लेटा अज्ञात चोरटय़ाने चोरुन नेल्या होत्या. याबाबत पोलिसात तक्रार दाखल झाली होती. त्या अनुषंगाने वरिष्ठांच्या सुचनानुसार शहरात घडत असलेल्या चोऱयांचा तपासही सुरु होता. दि. 15 जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना या चोरीच्या गुन्हय़ातील संशयित आरोपी साताऱयातील फलटण रस्त्यावर असलेल्या रामकुंड परिसरातील भिक्षेकरीगृहाजवळ येणार असल्याची खबर मिळाली होती.
त्यानुसार पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास आरोपीस पकडण्याच्या सूचना दिल्यानंतर पथकाने केलेल्या कारवाई हा चोरटा हाती लागला. त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने चोरीची कबुली दिली. तो कंपनीचाच कामगार असून त्याच्याकडून चोरीचा माल विकून आलेले 40 हजार रुपये ते पोलिसांनी जप्त केले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जऱहाड, सहाय्यक फौजदार जोतीराम बर्गे, हवालदार कांतीलाल नवघणे, सुधीर बनकर, मुबीन मुलाणी, विजय कांबळे, पोलीस नाईक शरद बेबले, नितीन गोगावले, प्रविण फडतरे, मुनीर मुल्ला, प्रमोद सावंत, निलेश काटकर, कॉन्स्टेबल विक्रम पिसाळ, विशाल पवार व विजय सावंत यांनी या कारवाईत सहभाग घेतला.









