वार्ताहर/ कुद्रेमनी
उद्याचा भारत घडविण्यासाठी मुलांना वाचू द्या. बाल साहित्य सक्षम झाले तरच देशाचा भविष्यकाळ सक्षम राहील, असे उद्गार ज्योती महाविद्यालयाचे प्राध्यापक मायाप्पा पाटील यांनी काढले.
कुदेमनी येथील बलभीम साहित्य संघाच्यावतीने दि. 12 जानेवारी रोजी चौदावे मराठी साहित्य संमेलन होत आहे. संमेलनाच्या मंडपाची मुहूर्तमेढ रोवण्याचा कार्यक्रम कुद्रेमनी हायस्कूलच्या पटांगणावरील कै. परशराम गुरव साहित्यनगरीत झाला. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून पाटील बोलत होते. सरकारी मराठी शाळा एसडीएमसीचे अध्यक्ष भैरू आनंदाचे, डॉ. विजय पाटील, रवळू ना. पाटील, जवान शंकर गुरव व सौ. भारती यांच्या हस्ते पूजन होऊन मुहूर्तमेढाची उभारणी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उचगाव येथील स्वामी विवेकानंद हायस्कूलचे मुख्याध्यापक एल. डी. चौगुले होते.
गावातील विठ्ठल रखुमाई मंदिरापासून मिरवणुक काढण्यात आली. यावेळी हभप अर्जुन राजगोळकर, अर्जुन जांबोटकर यांच्याहस्ते विठ्ठल रखुमाई पूजन झाले. यानंतर हभप निंगाप्पा पाटील, जोतिबा पाटील, प्रकाश हरिजन, कृष्णा धामणेकर यांच्या हस्ते दिंडी पूजन झाले. यावेळी कै. परशराम गुरव स्मारक पूजन ईश्वर गुरव यांनी केले.
तुकाराम धामणेकर, प्रशांत पाटील, मल्लाप्पा जांबोटकर, राम पन्हाळकर, विक्रम पाटील, बबन गुरव यांच्याहस्ते दिपप्रज्वलन झाले. यानंतर ग्राम पंचायत अध्यक्षा अस्मिता सुतार, सदस्य काशिनाथ गुरव, नागेश राजगोळकर, शामला गुरव, अंकुश धामणेकर, जकाप्पा पाटील यांच्या हस्ते विविध फोटो प्रतिमा पूजन झाले.
यावेळी साहित्य संघाचे अध्यक्ष एम. बी. गुरव यांनी स्वागत व शिवाजी शिंदे यांनी प्रास्ताविक केले. ग्रा. पं. अध्यक्ष वैजनाथ शिवणगेकर आणि एल. डी. चौगुले यांची भाषणे झाली. नागेश राजगोळकर यांनी सुत्रसंचालन केले व राजू राजगोळकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास साहित्यप्रेमी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.









