शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण
वार्ताहर/ कुद्रेमनी
बेळगाव, चंदगड मुख्य रस्त्यावरील कुद्रेमनी गावच्या फाटय़ाजवळील शेतवडी भागात रानटी गवीरेडय़ांचा कळप दाखल झाल्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्राम पंचायत सदस्य मोहन गो. पाटील यांचा रस्त्यालगत ऊसमळा आहे. ऊस तोडणी झाल्यामुळे उसाचे कोंब मळय़ामध्ये आहेत. सोमवारी सकाळी 20 ते 25 लहान मोठय़ा गवीरेडय़ांचा कळप याठिकाणी अनेकांच्या निदर्शनास आला. मोहन पाटील यांनी नागरिकांच्या जागरुकतेसाठी मोबाईलवर गवीरेडय़ांचा फोटो व्हायरल केला होता. हे प्राणी पाहण्यासाठी ये-जा करणाऱयांची रस्त्यावर गर्दी झाली होती. गर्दीच्या आवाजाने याठिकाणी असलेल्या गणेशबागेकडून पुढे जंगलाच्या दिशेने कूच केली.
गावच्या पश्चिमेला मोठा जंगल आहे. उत्तर बाजूला वैजनाथ डोंगर असून खाली पायथ्याला गवताचे कुरण, झाडी झुडुपे आहेत. त्यामुळे या भागात गवी रेडे, अस्वल, वनगायांचा वावर दिसून येतो. गेल्या दोन वर्षांपूर्वी बिबटय़ासदृष्य प्राणी याच भागात वावरत होता. अनेक राखणीच्या कुत्र्यांचा त्याच्याकडून बळी गेला. सध्या या हिंस्त्र प्राण्याचा मागमूस दिसत नाही.
सध्या जंगलातील गवताची कुरणं वाळून गेली आहेत. हिरव्या चाऱयाच्या व पाण्याच्या शोधार्थ हे प्राणी इतरत्र संचारत असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
सध्या या भागात भात, नाचणा पिकाची कापणी मळणीची कामे आटोक्यात आलेली आहेत. पाणथळ शिवारी भागात भाताची बांधणी करून ठेवलेली आहेत. भागात ऊसतोडणीला जोर आहे. त्यामुळे पिकांची नुकसान होण्याची शक्यता मात्र कमी आहे.
सुगीनंतर या भागात कोबी, मिरची, बटाटे, बिन्स, ऊस लागवडीची कामं सुरू होणार आहेत. शेतीची मशागत करणे, पिकांना पाणी देण्यासाठी रात्री-दिवसा शेतकऱयांना शेतावर जावे लागते. जंगली जनावरांच्या मुक्त संचारामुळे आकस्मात धोक्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातवरण तयार झाले आहे.









