वार्ताहर/ कुद्रेमनी
जंगली प्राण्यांच्या कळपाकडून कुद्रेमनी येथील शेतकऱयांच्या शेतातील पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.
श्री क्षेत्र वैजनाथ देवस्थान डोंगर पायथ्याशी कुद्रेमनी गाव हद्दीतील भाटे कुरण शेतवडी भागात शेतकऱयांचे उसाचे मळे, भातशेती आहे. जंगलात गवीरडे, रानडुकरांच्या कळपांचा मोठा वावर असून ही जंगली जनावरे रात्री किंवा दिवसा ऊस मळय़ात किंवा भातशेतीत संचारत आहेत. शेतपिकाच्या संरक्षणासाठी पावसाळी दिवसात शेतकऱयांना रात्रीच्यावेळी जीव धोक्यात घालून शेतावर जावून वस्ती करण्याची पाळी आली आहे.
बी-बियांणे, खत, वाहतूक भाडे, मजुरी आदींसाठी वारेमाप खर्च करून शेतकऱयांनी उसाचे चांगले मळे पिकविलेले आहेत. रोप लागवड करून भाताची शेती केली आहे. मात्र, जंगली प्राण्यांच्या कळपांकडून मळय़ातील ऊस मोडून आवडे झाले आहेत. तर भाताची रोप चिखलात रुतून जमीनदोस्त झाली आहेत. शेतीच्या नुकसानीमुळे शेतकरी वर्ग हतबल झाला असून जंगली जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.