जि.पं.सदस्या सरस्वती पाटील यांची जिल्हाधिकाऱयांकडे विनंती
प्रतिनिधी / बेळगाव
कुदेमानी गावाला जाताना महाराष्ट्राच्या हद्दीतून जावे लागते. कुदेमानी गावाला सभोवताली संपूर्ण महाराष्ट्राची हद्द आहे. या गावातून बेळगावकडे येण्यासाठी शिनोळी मार्गेच यावे लागते. मात्र त्या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस तर कर्नाटकच्या हद्दीत कर्नाटक पोलीस त्यांची अडवणूक करत आहेत. त्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. तेंव्हा कुदेमानी ग्रामस्थांना बेळगावकडे येण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाव्दारे केली आहे.
कुदेमानी गावचा संपर्क हा बेळगावशीच आहे. रोजच्या कामासाठी ते बेळगावला येत असतात. कामासाठी, खदेरीसाठी याचबरोबर दवाखान्यासाठी बेळगावकडेच धाव घ्यावी लागते. महाराष्ट्रातून येताना महाराष्ट्रचे पोलीस त्यांची अडवणूक करत आहेत. महाराष्ट्राच्या पोलिसांनी सोडले तरी काही वेळा कर्नाटकचे पोलीस अडवणूक करत आहेत. त्यामुळे मोठी समस्या निर्माण होत आहे. रुग्णांना बेळगावला हलवावे लागते. सध्या या गावामध्ये काही महिला गर्भवती आहेत. त्यांना तर बेळगावकडेच जावे लागते. त्यासाठी अशा महिलांना कोणीही अडवणूक करु नये, अशी मागणी करण्यात आली आहे.
शिनोळी जवळ चर मारुन रस्ता अडविण्यात आला होता. आता ती चर बुजविण्यात आली आहे. मात्र पोलीस त्यांची अडवणूक करत आहेत. असे जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांना सांगण्यात आले. त्यावर तातडीने बेळगाव तहसीलदारांना सांगून कुदेमानी ग्रामस्थांची ही समस्या सोडविण्याची सुचना केली आहे.