जीवामृत-बिजामृताचा वापर करून घेताहेत विविध आंतरिक पिके : सिव्हिल इंजिनिअर उदय गोवेकर यांचा उपक्रम अनुकरणीय

वार्ताहर / कुदेमनी
देशी गायींच्या शेण व गोमुत्रापासून तयार केलेल्या जीवामृताच्या साहाय्याने विविध प्रकारच्या आंतरिक पिकांची नैसर्गिक शेती पिकविण्याचा उपक्रम कुदेमनी येथील सिव्हिल इंजिनिअर उदय जीवनराव गोवेकर यांनी राबविला आहे. सर्वांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी आणि आर्थिकदृष्टय़ा शेतकऱयांना फायदेशीर अशा शेतीच्या संकल्पनेतून एकाचवेळी अनेक पिकांचे आंतरिक पद्धतीने उत्पादन घेऊन या भागात अनुकरणीय असा आदर्श निर्माण केला आहे.
एका देशी गायीपासून तीस एकर शेती करता येते. एकूण पाण्याच्या 10 टक्के पाण्याचा वापर करून ऊस पिकविता येतो. हवेतील बाष्पाचा पीक पोसण्यास उपयोग होतो. पिकांना चांगला हमीभाव मिळतो. देशी गायीचे शेण व गोमुत्राचा वापर करून कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत किंवा औषधांचा वापर न करता कमी खर्चात मोठे उत्पादन घेणे ही या शेतीची विशेषतः असून आरोग्यहिताच्या दृष्टीने देशात नैसर्गिक शेती पिकविण्याची गरज असल्याची माहिती त्यांनी दिली.

नैसर्गिक शेती करण्यासाठी केवळ देशी गायीपासून जीवामृत व बीजामृत तयार करणे गरजेचे आहे. ते घरीच तयार करता येते. दोनशे लिटर पाणी, दहा लिटर देशी गायीचे गोमूत्र, दहा किलो देशी गायीचे शेण, एक किलो गूळ, एक किलो बेसन पीठ, मूठभर सकस माती यांचे मिश्रण म्हणजे जीवामृत होय. ते घरीच तयार करता येते. तीस एकर शेतजमिनीसाठी याचा वापर होऊ शकतो. जमिनीत बीजपेरणी करताना किंवा लागवड करताना जीवामृत पाण्याच्या प्रवाहात सोडणे किंवा त्याची फवारणी करता येते. आठवडा-पंधरवडय़ाच्या अंतराने पुढे त्याचा वापर करता येतो. यामुळे जमिनीचा पोत सुधारून जमीन कसदार होते व पिके चांगली पिकतात.

गोमूत्र, शेण व चुणा यांचे मिश्रण करून बिजामृत तयार करावे. पेरणी किंवा लागवडीपूर्वी बियाणे या मिश्रणात भिजवून लागवड करावीत. त्यामुळे बियाणाला कीड लागत नाही व बियाणे खराब होत नाहीत. गेल्या चार-पाच वर्षांपासून गोवेकर हे आपल्या पाच-सहा एकर जमिनीत नैसर्गिक शेती पिकवितात. ऊस, बटाटा, रताळी, बासमती भात, खपली गहू, मिरची, नाचणा, गवार, गाजर, कोबी, भुईमूग, भेंडी, हरभरा, आले, हळद, मका, फ्लॉवर अशी विविध पिके रब्बी व खरीप दोन्ही हंगामात मोठय़ा प्रमाणात पिकवितात. या पिकांसाठी कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत किंवा औषधांचा वापर केला जात नाही. जीवामृत व बिजामृताचा वापर करून पिकांचे चांगले उत्पादन घेत आहेत.
सिव्हिल इंजिनिअर असूनही नैसर्गिक शेती करण्यावर भर
उदय जीवनराव गोवेकर हे सिव्हिल इंजिनिअर असून गेल्या तीस-पस्तीस वर्षांपासून ते नोकरीसाठी आपल्या कुटुंबासह मुंबईला वास्तव्यास आहेत. हल्लीच्या रासायनिक शेतीमुळे जमिनीची सुपिकता नष्ट होऊन कस कमी झाला आहे. या शेतीत पिकलेली पिके म्हणजे अन्नच विषमय होत आहे. माणसांची बदलती जीवनशैली व खाण्यापिण्याच्या बदलत्या सवयींमुळे आरोग्य धोक्मयात आले आहे. हृदयविकार, कॅन्सर, किडनीचे विकार, मधुमेह, लकवा आदी अनेक विकार झपाटय़ाने वाढत आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी नैसर्गिक शेतातील पिकांचा खाण्यापिण्यात वापर होणे महत्त्वाचे असून शेतकऱयांनी नैसर्गिक शेती करण्यावर भर दिला पाहिजे, या विचारातून स्वतःपासूनच सुरुवात केल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
अनेकांकडून मिळाली प्रेरणा
जमिनीच्या मशागतीपासून ते पीक घेण्यापर्यंत पुष्कळ राबणूक करावी लागते. गावातील शेतकरी चाळोबा नारायण कागणकर व त्यांच्या पत्नी विमल हे दाम्पत्य कामासाठी नेहमी मदत करीत असते. शेतीकामासाठी अधूनमधून मुंबईहून गोवेकर यांना गावी यावे लागते. पत्नी भारती गोवेकर व मुले अजिंक्मय व उत्कर्ष गोवेकर यांनाही शेतीकामाची आवड निर्माण झाली आहे. उचगावचे मित्र डॉ. माधव देसाई यांच्याकडून नैसर्गिक शेतीची प्रेरणा मिळाली. आंबेवाडीचे कल्लाप्पा तरळे यांच्याकडून मार्गदर्शन मिळाले. अमरावतीचे पद्मश्रीप्राप्त सुभाष पाळेकर यांनी राबविलेल्या नैसर्गिक शेतीला भेट देऊन प्रत्यक्ष अनुभव घेऊन राज्यभरात विविध ठिकाणी शेतकी शिबिरांमध्ये हजर राहून नैसर्गिक शेतीचे ज्ञान अवगत झाले असून मोदी सरकारने नैसर्गिक शेतीला प्राधान्य दिले आहे. अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
दरवषी उसामध्ये बासमती भात, खपली गहू, भुईमूग, मका अशी आंतरिक पिके घेण्याबरोबरच रताळी झाल्यानंतर आले, हळद, कोबी, मिरची, फ्लॉवर आदी विविध पिके एकाचवेळी मोठय़ा प्रमाणात पिकविली जातात. यासाठी कोणत्याही प्रकारची रासायनिक खते किंवा औषधांचा वापर केला जात नाही.
नैसर्गिक शेतीमुळे रोगराईला आळा बसेल
नैसर्गिक शेतीमध्ये पिकणारी पिके ही इतर पिकांपेक्षा सकस व चवीला खूप रुचकर असतात. त्यांना खूप मागणी आहे. बाजारपेठेत चांगला भाव मिळतो. उसापासून गुऱहाळामध्ये उत्तम प्रतिचे गूळ व काकवी तयार होते. आल्यापासून सुंठ व सुंठ पावडर, भुईमुगापासून खाद्यतेल तयार केले जाते. घरी वापरण्यासाठी व विक्रीसाठी याचा उपयोग केला जातो. आंतरिक पिके पिकविल्यामुळे मोठा खर्च निभावतो. या शेतीमुळे देशी गायींचे संवर्धन होण्यास मदत होईल. जमिनीत सुपिकता निर्माण होईल. या पिकांमुळे आरोग्याला कोणताही त्रास होणार नाही. अन्नधान्य विषमुक्त होऊन रोगराईला आळा बसेल. नैसर्गिक शेती पिकविणे म्हणजे आरोग्य रक्षणासाठी केलेली देशसेवाच असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली असून संपर्कासाठी 9223315467 या क्रमांकाशी संपर्क साधावा, असे गोवेकर यांनी कळविले आहे.









