सांगली / प्रतिनिधी
मिरज तालुक्यातील माधवनगर येथील सोमवार पेठेत राहणाऱ्या प्रवीण हनुमानदास बियाणी वय ३४ याच्यावर संशयित गणेश जाधव याने कोयत्याने हल्ला करून त्यांना जखमी केले आहे. प्रवीण बियाणी यांच्या मालकीचे कुत्रे सातत्याने गणेश जाधव यांच्या गॅरेजसमोर घाण करत होते. शनिवारीही तोच प्रकार घडल्याने गणेश जाधव यांनी बियाणी यांच्यावर खूनी हल्ला करून जखमी केले आहे. याबाबत संजयनगर पोलीस ठाण्यात गणेश जाधव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी प्रवीण बियाणी यांच्या मालकीचे कुत्रे आहे. ते कुत्रे घेवून परिसरात फिरत असतात. याचठिकाणी गणेश जाधव यांचे गॅरेज आहे. या गॅरेजच्या बाहेर हे कुत्रे घाण करते त्यामुळे यापूर्वी बियाणी आणि जाधव यांच्यात वादावादी आणि मारामारी झाली होती. पोलीसांनी या दोघांनाही समजावून सांगितले होते. त्यामुळे हे वाद मिटले होते. शनिवारी पुन्हा एकदा बियाणी यांच्या कुत्र्याने जाधव यांच्या गॅरेजसमोर धाण केल्याने जाधव हे चिडले.
.याचा जाब विचारण्यासाठी ते बिवाणी यांच्याकडे गेले असता त्यात बादावादी झाली आणि या बादाबादीतून जाधव यांनी बियाणी यांच्या हातावर आणि पाठीवर कोयत्याने वार करून जखमी केले. बियाणी यांना तात्काळ सिव्हील हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले त्यानंतर त्यांना खासगी हॉस्पिटल येथे नेण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.