ना ये भौंगते हैं, ना गुर्राते हैं…बस काटते हैं
लव्ह फिल्म्स आणि विशाल भारद्वाज फिल्म्सने ‘कुत्ते’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. हा चित्रपट आसमान भारद्वाज यांच्याकडून दिग्दर्शित केला जाणार आहे. चित्रपटाचे मोशन-पोस्टर प्रदर्शित करत निर्मात्यांनी मनोरंजात्मक प्रवास घडविणार असल्याचे म्हटले आहे. चित्रपटात अर्जुन कपूर, कोंकणा सेन शर्मा, नसीरुद्दीन शाह, कुमुद मिश्रा, राधिका मदान, शार्दुल भारद्वाज आणि तब्बू हे दिग्गज कलाकार दिसून येणार आहेत. अर्जुनने कुत्तेचा फर्स्ट लुक शेअर करत ‘ना ये भौंकते है, ना गुर्राते है…बस काटते है’ असे म्हटले आहे.
आसमान आणि विशाल भारद्वाज यांची पटकथा असलेला ‘कुत्ते’ हा चित्रपट थ्रिलर स्वरुपातील असेल. 2021 च्या अखेरीस याचे चित्रिकरण सुरू होणार आहे. आसमानने स्कुल ऑफ व्हिज्युअल आर्ट्समध्ये चित्रपटनिर्मितीचे शिक्षण घेतले आहे. वडिल विशाल भारद्वाज यांना त्याने ‘7 खून माफ’, ‘मटरू की बिजली का मंडोला’ आणि ‘पटाखा’मध्ये दिग्दर्शनात सहाय्य केले होते.
कुत्तेची पटकथा आणि कलाकार दोन्हीही उत्तम आहेत. चित्रपटाची निर्मिती टी-सीरिज ही कंपनी करत आहे. तर चित्रपटाला विशाल भारद्वाज यांचे संगीत लाभले आहे. गुलजार यांच्याकडून गीतांचे लेखन करण्यात आले आहे.
बॉलिवूडसाठी इच्छुक मनी हाइस्टची ‘टोक्यो’
नेटफ्लिक्सचा शो ‘मनी हाइस्ट’मध्ये टोक्यो ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री उर्सुला कोरबेरो आता जगभरात लोकप्रिय झाली आहे. स्पॅनिश भाषेत मनी हाइस्ट शोचे नाव ला कासा डे पपेल आहे. हा शो इंग्रजीसह हिंदीतही डब करण्यात आला आहे. जगातील अन्य देशांसोबत भारतातही याचा मोठा चाहतावर्ग आहे. आता या शोचा पाचवा सीझन येण्यापूर्वी उर्सुलाने एक मुलाखत दिली आहे.
बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये हिंदी बोलणारी व्यक्तिरेखा साकारताना आनंद वाटणार असल्याचे तिने म्हटले आहे. मी बॉलिवूडचे अनेक चित्रपट पाहिले आहेत. ही चित्रपटसृष्टी मोठी आणि लोकप्रिय असल्याचे मला माहिती आहे. स्लमडॉग मिलियनेर हा चित्रपट त्यात सर्वात पसंत पडल्याचे ती सांगते.
जर कुणी मला हिंदी शिकविणारा व्यक्ती भेटला आणि भाषा शिकण्यासाठी वेळ मिळाला तर मी हिंदी बोलणारी व्यक्तिरेखा चित्रपटात साकारू शकते. अमेरिकेत जेव्हा मी पहिला इंग्रजी चित्रपट केला होता, तेव्हा माझे इंग्रजीचे ज्ञान फारसे चांगले नव्हते. पण मला आव्हाने स्वीकारण्यास आवडतात आणि त्यांना मी आश्वासकपणे सामोरे जाते असे उर्सुलाने म्हटले आहे.









