अध्याय चौदावा
भगवंत म्हणाले, उद्धवा भक्तीचे शुद्ध स्वरूप समजून घे. माझ्या भक्तीने जोपर्यंत शरीर पुलकित होत नाही, चित्त द्रवत नाही, आनंदाश्रू वाहात नाहीत, तोपर्यंत अंतःकरण पूर्ण शुद्ध होत नाही. आवडीने हरीची कथा श्रवण केली असता, नानाप्रकारची चरित्रे ऐकली असता, माझ्या स्वरूपाचाच ऊहापोह निरंतर हृदयात होत असताना, चित्तात पालट होतो आणि माझी भक्ती उत्पन्न होते. त्यामुळे मनात जो भक्तिप्रेमाचा पाझर फुटतो, तो बाहेर व्यक्त होणाऱया स्थितीवरून स्पष्ट दिसतो. अंतःकरणात सुख उत्पन्न झाले की, बाहेर रोमांच उभे राहतात. त्या आत्मानुभवसुखाची गोडी डोळय़ातून प्रेमाश्रुच्या रूपाने प्रत्यक्ष वाहू लागते. माझ्या भक्तीच्या आवडीने ‘अहं’ आणि ‘सोहं’ ह्या दोन्ही दुव्यांनी अभिमानाची बेडी सुटते आणि विषयाची गोडी नाहीशी होते. त्यावेळी दोन्ही डोळय़ातील तेज चमकू लागते आणि ते प्रसन्न दिसतात. देहाचे भान स्फुरेनासे होते आणि मन भगवंताच्या ठिकाणी रंगून जाते. उद्धवा माझी भक्ती आणि विषय एकाचवेळी मनात राहू शकत नाहीत. जो माझ्या भक्तीला लागतो, तो तत्काळ पवित्र होतो. इतकेच नव्हे, तर तो त्रैलोक्मयही पावन करतो. अंगावर रोमांच ताठ उभे राहतात, धर्मबिंदु चमकू लागतात, चैतन्याने चित्ताला पाझर फुटतो आणि त्यामुळे वाणीही सद्गदित होते. पोटात आनंद भरून आला म्हणजे दृष्टी अर्धोन्मीलित होते, जीव-शिवांची घट्ट मिठी पडते, ध्येय, ध्याता आणि ध्यान ही त्रिपुटी नष्ट होते. रडणे आणि हासणे सोडीत नाही आणि त्यातच आत्मस्वरूपाची अशी आश्चर्यकारक आवड उत्पन्न होते की, त्यामुळे तो मोठय़ा आवडीने गाऊ लागतो, डोळय़ातून अश्रूंचा पूर वाहू लागतो, गहिवर पोटात मावेनासा होतो, देहभान सुटून जाते व तो मूर्छा येऊन भूमीवर पडतो.
तो मोठमोठय़ाने आक्रोश करून रडू लागतो. पुन्हा पुन्हा हुंदके येत असतात. रडता रडताच गदगदा हासू लागतो. ज्याप्रमाणे ब्रह्मसमंध अंगांत येऊन वेड लागावे, त्याप्रमाणे त्याची अवस्था होते. रडणे आणि हासणे सोडीत नाही. माझे आणि तुझे हे विसरून जाऊन, लोकलज्जा सोडून, अत्यंत हर्षाने व प्रेमाच्या आवडीने निःशंकपणे नाचू लागतो. अशा प्रकारे त्याचे गाणे, नाचणे व हासणे चाललेले असते. पण तो रडतो कशाकरिता ? त्याचीही कारणे तुला सांगतो. एखादे मूल आईपासून चुकून भलतीकडेच गेलेले असते, ते आईला हुडकू लागते पण ती त्याला कोठे सापडत नाही. आणि मग तिची अकस्मात् भेट झाली की ते हंबरडा फोडून रडू लागते व प्रेमाने आईला घट्ट मिठी मारते. त्याप्रमाणे जीवात्मा आणि परमात्मा ह्या दोघांची भ्रांतिरूप नगरात चुकामुक झालेली असते, त्यांची अचानक गाठ पडली असता जीवही हुंदके देऊन मोठय़ाने रडू लागतो. फार दिवसांनी भेट झाल्यामुळे ऐक्मयभावाने परस्परास मिठी बसते, त्या आनंदाने आलेला प्रेमाचा उमाळा पोटात मावत नाही व त्यामुळे प्रेमभावाने रडू कोसळते. अनेक प्रकारे नाटकी आणि मायावी असलेला देव खरोखर कोणास सापडत नाही पण तोच मला घरातल्या घरातच सापडला, अशा आश्चर्याने तटस्थ होऊन तो पाहत राहतो. देव हा सदोदित जवळच असतो. त्याच्याकरिता लोक कसे वेडय़ासारखे होऊन देशोदेशी त्याला पहावयाला भटकत असतात ! हे पाहून त्याला खदखदा हसावयास येते. देव हा सर्वांना अजिंक्मय आहे पण त्याच भगवंताला मी जिंकले आणि धरून हृदयात ठेवले, असे म्हणून तो आनंदाने नाचू लागतो. दुजेपणाची गोष्टच नाहीशी करून स्वतः भगवंताला जिंकले आणि जगामध्ये यशस्वी झाला, म्हणून तो मोठय़ा आनंदाने गात व नाचत असतो. पहावयास गेले असता मला दुसरे कोणी दिसतच नाही अशी स्थिती होते, म्हणून लाजायलाही विसरतो. अशा रीतीने तो जगामध्ये निर्लज्ज होतो. त्याच्या निर्लज्जतेचे हे कारण होय. ह्याप्रमाणे माझे भक्त भक्तीयुक्त होऊन आत्मानंदाने गात असतात आणि नाचत असतात. त्यांच्या त्या आनंदाने त्रैलोक्मय पवित्र होते.
क्रमशः







