मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपात जोरदार संघर्ष सुरू झाला असून, आगामी काळात मुंबईत शिवसेना विरुद्ध भाजप हा जोरदार संघर्ष पहायला मिळणार आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपात जोरदार संघर्ष सुरू झाला असून, महापालिकेवर स्वबळावर भाजपचा भगवा फडकवणार असल्याचा निर्धार माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर त्याचे चांगलेच राजकीय पडसाद उमटले. शिवसेनेचा भगवा हा मिश्रित झाला असून आता खरा हिंदुत्वाचा भगवा हा भाजपचा असल्याचे सांगताना भाजप नेत्यांनी शिवसेनेवर चांगलीच टीका केली तर शिवसेनेचा भगवा उतरवणे दहा पिढय़ांना जमणार नसल्याचे सांगत भाजपला जशास तसे उत्तर दिले. त्यामुळे आगामी काळात मुंबईत शिवसेना विरुद्ध भाजप हा जोरदार संघर्ष पहायला मिळणार आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपला स्पष्ट बहुमत असताना सत्तेबाहेर रहायला लागणे याचे शल्य आजदेखील भाजपला आहे. भाजप दिलेला शब्द पाळत नाही. दगाबाज पक्ष असून ज्याच्याशी मैत्री करतो त्यालाच त्या राज्यात संपवतो अशी टीका भाजपच्या सर्व विरोधी पक्षांनी केली, त्यातच बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत असताना मुख्यमंत्रीपदावरचा दावा भाजपला सोडावा लागला. नितीशकुमार यांना मिळालेले मुख्यमंत्रीपद हे शिवसेनेमुळे मिळाले असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेकडून देण्यात आली. त्यामुळे राज्यात भाजप आणि शिवसेना असा जोरदार संघर्ष पहायला मिळत आहे. भाजपने राज्यातील देवस्थाने उघडण्यासाठी घंटानाद आंदोलने केली मात्र मुख्यमंत्र्यांनी या लोकांचे काहीही न ऐकता दिवाळीत पाडव्याच्या दिवशी मंदिरे उघडी केली. आता शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकारने स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याच्या सूचना दिल्यानंतर भाजपने आता शाळा उघडण्याची सरकारने घाई करू नये अशी प्रतिक्रिया दिली आहे. मुळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विरोधकांच्या मागण्यांना जुमानत नाहीत तसेच कोणीही कितीही सांगितले तरी ते योग्य वेळी निर्णय घेतात. त्यामुळे भाजप नेत्यांना मुख्यमंत्री विचारत नसल्याचे शल्यदेखील त्यांना आहे. त्यातच नाथाभाऊंसारखा ज्येष्ठ नेता भाजप सोडून गेल्याने पक्षात काहीशी मरगळ आली होती. त्यात आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला दगाफटका बसू नये म्हणून अखेर भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकताना स्वबळावर लढण्याचा नारा देत मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या विकास कामांचा पाढा मुंबई कार्यकारिणीत वाचताना शिवसेनेवर जोरदार टीका केली. मुंबईत मेट्रोचे जाळे असो किंवा मुंबईतील इतर विकास कामे ही प्रामुख्याने आपण मुख्यमंत्री असताना झाल्याचे ते म्हणाले. 2017 साली झालेल्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढले होते, त्यावेळी देखील भाजपा शिवसेनेच्या जवळपास पोहचली होती, मात्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारला सर्व मुद्यांवर लक्ष्य केल्यानंतर आता भाजपने शिवसेनेकडे असणारी मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यातून मिळविण्यासाठी तयारी सुरू केली आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मुंबई महापालिका निवडणूक महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार असून भाजपचे स्वप्न हे स्वप्नच राहील असे सांगितले. राष्ट्रवादीने या निवडणुकीची जबाबदारी खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहीत पवार यांच्यावर सोपविली आहे. यापूर्वी मुंबईत पक्षाचा चेहरा असणारे माजी मंत्री सचिन अहिर, माजी खासदार संजय दिना पाटील आता शिवसेनेत गेले आहेत. मुंबईत सध्या तरी राष्ट्रवादीकडे कोणता चेहरा नसल्याने आता मुंबईत पक्ष मजबूत करण्यासाठी सुप्रिया सुळे आणि रोहीत पवार लक्ष घालणार असल्याचे पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.
विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधरांच्या 5 जागांसाठी मतदान होणार असून ही निवडणूकदेखील महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी होत असून या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस प्रत्येकी 2 तर शिवसेना एका जागेवर लढत आहे. या निवडणुकीत काय होते हे बघणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. एक मात्र नक्की भाजपचे सर्व नेते तसेच प्रवक्ते हे रोज सरकारविरोधात आक्रमक होत असून रोज सरकारवर टीका करत आहेत. कधी जमीन घोटाळा, उद्धव ठाकरे यांनी खरेदी केलेली जमीन, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मुलाच्या कंपनीला दिलेले कंत्राट असो किंवा कांजुर येथील जागेवर होणारे मेट्रो रेल्वेचे कारशेड असो शिवसेना आणि भाजपात यावरून जोरदार संघर्ष पहायला मिळाला. भाजपने सोमवारी राज्यात सर्वत्र वीज बिलांची होळी करताना महाविकास आघाडी सरकारचा जोरदार निषेध केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेदेखील सरकारचा निषेध करताना वाढीव वीज बिलाच्या संदर्भात सरकारला अल्टीमेटम दिला आहे.
मुंबईत कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असून ही त्सुनामी होऊ शकते, त्यामुळे सरकारने आतापासूनच खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. 16 नोव्हेंबरला मुंबईत 400 रुग्णांची नोंद होत असताना 21 नोव्हेंबरला अडीच पट म्हणजे 1092 रुग्णांची नोंद होते हे धोकादायक आहे. अशीच परिस्थिती कायम राहिली तर मुंबईत 7 डिसेंबरपासून सुरू होणाऱया हिवाळी अधिवेशनाबाबत प्रश्नचिन्ह असणार आहे. पावसाळी अधिवेशन केवळ दोनच दिवसाचे पार पडले तर संसदेचे हिवाळी अधिवेशनदेखील पुढे ढकलण्यात आले आहे. आता अर्थसंकल्पीय आणि हिवाळी अधिवेशन एकत्र होणार आहे, त्याचप्रमाणे राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाबाबत निर्णय होऊ शकतो.








