‘वराह पुराणा’त जोपर्यंत या भूतलावर पर्वत, वने आणि सरोवरे आहेत, तोपर्यंत तुम्ही, तुमची मुले व भावी पिढय़ा सुखाने जगतील. ज्यांना ही गोष्ट कळेल त्यांना महामायेच्या प्रसादासह देवांनाही दुर्लभ असे परमस्थान लाभेल’, असे शेकडो वर्षांपूर्वी म्हटलेले आहे. ते आजच्या काळातही तितकेच यथोचित आहे परंतु असे असताना खरेतर आज आम्ही आमच्या गरजांसाठी आणि सोयीखातर वृक्षांवर आणि जंगलांवरती वर्तमान आणि भविष्याचा विचार न करता निर्दयपणे कुऱहाड चालवत आहोत. आज आमचे जीवन इतके गतिमान झालेले आहे की, आम्हाला क्षणभरसुद्धा वृक्ष आणि जंगल यांचे सजीवमात्रांच्या जीवनात असलेल्या महत्त्वपूर्ण स्थानाचा विचार करायला उसंत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात अहमदनगर जिल्हय़ातल्या पारनेरजवळ असलेल्या पेमगिरी आणि गोव्यात काणकोणातील पैंगिणीतल्या प्रचंड मोठा विस्तार असलेल्या वडाच्या परिसराचे पर्यावरणीय महत्त्व जाणून घ्यायला वेळ नाही. प्राणवायु निर्मिती आणि कर्बवायुचे प्रमाण नियंत्रित करून, पर्यावरणाचे संतुलन राखण्यात वृक्ष आणि वृक्षवेलींनीयुक्त जंगले महत्त्वाचे योगदान देतात. इमारती लाकडे, अन्न, औषध यांचा पुरवठा करण्याबरोबर असंख्य गरजेच्या गोष्टी देणाऱया झाडांचे महत्त्व आपल्या ऋषी महंतांनी जाणले होते आणि त्यासाठी त्यांनी त्यांच्याशी सनातन काळापासून स्नेहबंध राखले होते. आज हे नाते झपाटय़ाने दुर्बल होऊ लागले आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या एका टोकावर वसलेल्या सिंधुदुर्गातल्या दोडामार्ग तालुक्यातल्या वैविध्यपूर्ण आणि वैशिष्टय़पूर्ण अशा जंगलांचे वैभव पाहण्यास आणि टिकवून ठेवण्यास गौणत्व लाभलेले आहे.
दोडामार्ग तालुक्यातल्या तिळारी म्हणजेच कोलवाळ नदीकिनारी वसलेला कुडाशे गाव कधीकाळी घनदाट जंगलांनी समृद्ध होता. शेती, बागायती आणि लोकवस्तीसाठी इथल्या मानवी समाजाने जी जंगलतोड एकेकाळी गरज म्हणून सुरू केली होती, ती आज भयानक स्वरुप धारण करून गावाच्या नैसर्गिक सौंदर्याच्या मुळावर घाला घालण्यास कारणीभूत झालेली आहे. ‘कुडासे गावातल्या दसई येथील तिळारीच्या उजव्या तिरावरती शतकोत्तर इतिहासाचा वारसा मिरवणारे महाकाय शिडमवृक्षाचे झाड या परिसराच्याच नव्हे तर एकंदर महाराष्ट्रातल्या वयोवृद्ध वृक्षांत ललामभूत ठरणारे असे नैसर्गिक संचित आहे. इथल्या नव्वदीच्या उंबरठय़ावरती असलेल्या वयस्कांच्यामते या महावृक्षाने चारशे वर्षांचा टप्पा गाठलेला असावा. टेट्रामिलस न्यूडीफ्लोरा या नावाने वनस्पती शास्त्रात परिचित असलेल्या या वृक्षाला मराठीत जंगली भेंडी म्हटले जाते तर गोवा-कोकणातले लोक त्याला शिडम म्हणतात. कुडाशेतल्या नव्या, सुशिक्षित पिढीला या महावृक्षाचा अभावाने नाव, पत्ता ठावुक आहे परंतु वयोवृद्ध मात्र त्याला आमचा शिडबा या आदरार्थी नावाने ओळखतात. बालपण, तरुणपणाचा काळ पारंपरिक मार्गावरती असलेल्या दसईतल्या या महावृक्षाच्या सावलीत गेला होता. आज तिळारी नदीतल्या दसईत पुलाचे बांधकाम सुरू झाल्याने या वृक्षाच्या नैसर्गिक वैभवाला धोका निर्माण झालेला आहे. कधीकाळी या महावृक्षावरती मधाची पोळी लटकायची आणि गावातल्या कष्टकऱयांना मधुरसाचा अपूर्व ठेवा प्राप्त व्हायचा. आज हवा, ध्वनी प्रदुषणाबरोबर इथल्या नदीतल्या मासेमारीसाठी स्फोटकांचा वापर होत असल्याने मधमाशांच्या अस्तित्वावरती गदा आलेली आहे. बागायतीत रासायनिक खते, कीटकनाशकांच्या होणाऱया वाढत्या वापरानेसुद्धा मधमाशांसाठी संकटे निर्माण केलेली आहे.
हा नैसर्गिकरित्या वाढलेला महावृक्ष परिसंस्थेतील पर्यावरणीय समतोल राखण्याबरोबर पक्षी, प्राणी आणि मधमाशांसारख्या कीटकांना नैसर्गिक अधिवास पुरविण्याचे कार्य करीत आलेला आहे. त्याच्या गळून पडणाऱया पाला-पाचोळय़ाचे विघटन लवकर होत असल्याने मूलद्रव्यांच्या चक्रीकरणाच्या प्रक्रियेला हातभार लागलेला आहे. शिडमाचा वृक्ष हा पानझडीचा असल्याने शिशिरात तो पानगळतीला सामोरा जातो. या वृक्षाला येणाऱया फुलांना चार हरित बाहय़कोश दलाचे आवरण असल्याने वनस्पती शास्त्रात त्याला टेट्रामेलस हे नाव प्राप्त झालेले आहे. काही वर्षांपूर्वी वानोशी येथील प्रविण देसाईंसोबत मुंबई येथील परेश चुरी, नितेश निकम आणि जयेश लांबोर यांनी शिडमच्या या महावृक्षाला भेट दिली असता त्यांना या महावृक्षावरती आणि वृक्षाखाली एकवीस प्रजातीच्या वनस्पती जगत असल्याचे दृष्टीस पडलेले आहे. या वृक्षाने आपल्या अंगा-खांद्यांवरती कडेवर लहान मुलांना घ्यावे, त्याप्रमाणे त्या वनस्पतींचे भरण-पोषण केलेले आहे. गोव्यातल्या म्हादई महावीर अभयारण्यात महाकाय अशा शिडमाची झाडे पाहायला मिळतात परंतु कुडाशेत तिळारी नदीकिनारी कित्येक दशकांपासून उभा असलेल्या शिडमासारख्या महावृक्षाचे स्थान अद्वितीय असेच आहे. सर्वसाधारणपणे पानझडी जंगलात आढळणाऱया शिडमाची झाडे बरीच वर्षे जगतात आणि त्यामुळे ती महावृक्ष म्हणून विकसित होतात. ही झाडे आशिया, ऑस्ट्रेलियाच्या काही भागात आढळत असून, त्यापैकी कंबोडियातल्या ता प्रोहम येथील शिडम महावृक्षाने आपल्या एकंदर स्वरुपाद्वारे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतलेले आहे. म्यानमार इथल्या यानगोनच्या शिडमाने तर दोनशे फूट उंची गाठल्याने तो वृक्ष त्यांचे नैसर्गिक संचित ठरलेला आहे. जंगली वृक्षांच्या गर्दीत असलेल्या या महावृक्षाबाबत रॉबर्ट ब्रॉवन याने 1844 साली इंडोनेशियातल्या जावातील त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचा अभ्यास करून माहिती प्रकाशात आणल्यावरती शिडमाच्या पर्यावरणीय योगदानाबाबत चर्चा होणे गरजेचे होते. नेपाळ, चीन, म्यानमार, थायलंड, इंडोनेशिया, उत्तर ऑस्ट्रेलियातल्या जंगलात लक्षवेधक ठरलेल्या या महावृक्षाचे महत्त्व अधोरेखित झालेले आहे. त्यामुळे थायलंड देशातल्या कॅट तियान राष्ट्रीय उद्यानात अथवा कंबोडियातल्या ता प्रोहम येथील शिडमाच्या महावृक्षाचे खास दर्शन व्हावे म्हणून देश-विदेशातले निसर्गप्रेमी पर्यटक हमखास येतात.
आपल्याकडे कधीकाळी ग्रामीण भागातल्या लोकमानसाने पर्यावरणीय संस्कृतीला प्राधान्य दिले होते आणि त्यामुळे त्यांच्याकडे देवराई, देववृक्ष संकल्पनांना महत्त्व लाभले होते. कुडाशेतला शिडम भव्यत्त्वाची आणि दिव्यत्त्वाची प्रचिती देणारा महावृक्ष असल्याने त्याला देवचाराचा अधिवास मानून, पिढय़ान्पिढय़ा समाजाने त्याच्याकडे आदर, श्रद्धेने पाहिले होते. सर्वसाधारणपणे शिडमवृक्ष 45 मीटर उंची गाठतो आणि त्याच्या बुंध्याचा विस्तार दहा मीटरपर्यंत होत असतो परंतु कुडाशेतला शिडम वृक्ष उंची आणि रुंदी या दृष्टिकोनातून वैशिष्टय़पूर्ण शोभण्यासारखा आहे. 50 मीटरच्या आसपास उंची तर बारा मीटरपेक्षा जास्त बुंध्याचा विस्तार झालेला हा महावृक्ष स्थानिक ग्रामपंचायतीच्या जैवविविधता व्यवस्थापन समितीने जैवविविधता कायदा 2002 द्वारे जैवविविधता वारसास्थळ म्हणून अधिसूचित करण्याबरोबर त्याच्या शाश्वत संवर्धन आणि संरक्षणासाठी प्रयत्न केले पाहिजे. कोल्हापूर जिल्हय़ातल्या चंदगड तालुक्यातल्या तुडयेत उगम पावणाऱया तिळारीला लाखो वर्षांचा इतिहास आहे. त्याची प्रचिती देणारे अद्भूत शिलाखंड ठिकठिकाणी आढळलेले आहेत. कुडाशेत दसईच्या परिसरात असलेल्या या शिडम महावृक्षापासून काही अंतरावरती तिळारी नदी किनारी आणि पात्रात विविध आकाराचे पाषाण आहेत. देशातल्या आणि गोवा-महाराष्ट्रातल्या वनस्पती शास्त्रज्ञांना नव्हे तर अन्य संशोधकांना कुडासे-वानोशी परिसरातला हा वारसा ज्ञानाचा अपूर्व आणि अमूल्य ठेवा आहे.
– राजेंद्र पां. केरकर








