एमएनजी गॅस पाईप लाईनसाठी रस्त्यावर खोदाई
चर व्यवस्थित न बुजविल्याने वाहनधारकांना होतोय त्रास
संबंधित कंपनीला रस्ते सुस्थितीत करण्यास भाग पाडावे!
वार्ताहर / कुडाळ:
कुडाळ शहरात एमएनजी गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी रस्त्यांवर खोदलेले चर व्यवस्थित न बुजविल्याने ते वाहनधारकांना डोकेदुखी ठरत आहेत.
कुडाळ पोलीस ठाण्यानजिक ऐन फाटय़ावरचा चर दुचाकीस्वारांच्या जीवावर बेतू शकतो. नगरपंचायत प्रशासन किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी तो चर बुजविण्यासाठी संबंधित कंपनी व्यवस्थापनाला जाब का विचारात नाहीत?, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे. संबंधित गॅस कंपनीला चर भरून, रस्ते व्यवस्थित बुजवून सुस्थितीत करण्यास भाग पाडावे, अशीही मागणी होत आहे.
एमएनजी कंपनीतर्फे पाईपलाईन टाकण्याचे काम युद्धपातळीवर शहरात सुरू आहे. शहराच्या मुख्य व अंतर्गत रस्त्याच्या बाजूने ही लाईन टाकली जात आहे. ही लाईन क्रॉसिंगवेळी रस्त्यावर चर खोदण्यात आले. मात्र, लाईन टाकून घाईगडबडीत ते चर मातीने बुजविण्यात आले. माती दबली गेल्याने तसेच अलिकडे अवकाळी पाऊस कोसळल्याने चर आणखीन सखल झाले. त्यामुळे वाहनांना धक्के बसून प्रवाशांना नाहक त्रास होत आहे. गेले तीन-चार महिने ही परिस्थिती आहे.
पोलीस ठाण्यानजीक मोठा चर
कुडाळ पोलीस ठाण्यानजीकच्या फाटय़ावर खोदलेल्या भागावर टाकलेली माती खाली बसून मोठा चर पडला आहे. सावंतवाडीच्या दिशेने वळताना साईडपट्टीवर मोठा खड्डाच पडला आहे. दुचाकीस्वारांसाठी ते अतिशय घातक आहे. दुचाकीला हादरा बसून दुर्घटना घडू शकते. त्या चरात वाहन गेल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटते. दुचाकीच्या मागे बसलेली व्यक्ती बेसावध असते. अशावेळी तिचा तोल जाऊन जीवितास धोका उद्भवू शकतो. ही सध्याची तेथील परिस्थिती आहे.
नागरिक-वाहनधारकांकडून तीव्र नाराजी
या कंपनी व्यवस्थापनाने शहरात खोदलेले चर लाईन टाकून बुजविल्यानंतर पुन्हा माती दबून वाहनधारकांसाठी ते त्रासदायक ठरत आहेत. नागरिक व वाहनधारक याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. या कंपनीचा ठेकेदार याकडे दुर्लक्ष करीत आहे. ठेकेदार शहरातील या परिस्थितीकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करतो, याला नगरपंचायत प्रशासन व स्थानिक लोकाप्रतिनिधी जबाबदार आहेत, असा आरोप नागरिक व वाहनधरक करीत आहेत.
सत्ताधारी व विरोधकही मूग गिळून गप्प
न. पं. ला या कंपनीने काम सुरू असताना न. पं. च्या मालमत्तेचे नुकसान होणार, या हेतूने कंपनीकडून लाखो रुपये डिपॉझिट न. पं. कडे जमा आहे. चर खोदलेला भाग भरून देण्यास कंपनी टाळाटाळ करीत असताना न. पं. सत्ताधारी व विरोधकही मूग गिळून गप्प आहेत. त्याच्या मनमानी कारभाराला ते पाठिशी घालत आहेत. कारण एवढा चर पडूनही त्याच मार्गाने दुचाकी-चारचाकी वाहनांनी ये-जा करणाऱया स्थानिक लोकप्रतिनिधींना ते दिसत असताना ते गप्प आहेत. त्यांनी त्याला अशा कामाबाबत जाब विचारायला हवा, असे सर्वसामान्यांतून बोलले जात आहे.
चर अद्याप का बुजविण्यात आले नाहीत?
शहरातील ज्या-ज्याठिकाणी रस्त्यांवर चर खोदले. ते व्यवस्थित बुजविले नाहीत. रस्ते ही नगरपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभागाची मालमत्ता असते. रस्ता खोदून शासनाच्या मालमत्तेचे नुकसान केले जाते. तो खोदलेला भाग पक्क्या स्वरूपात बुजवून सुस्थितीत करणे ही संबंधित कंपनी व्यवस्थापनाची किंवा ठेकेदाराची जबाबदारी असते. मग शहरात कंपनीने खोदलेले चर अद्याप का बुजविण्यात आले नाहीत? पावसाळा सुरू झाल्यानंतर तेथे अधिक बिकट परिस्थिती निर्माण होणार आहे. यासाठी तत्पूर्वी कार्यवाही करणे गरजेचे आहे.









