वेंगुर्ल्यातील ट्रक चालक ‘पॉझिटिव्ह’ : कुडाळला प्रथमच कोरोनाचा शिरकाव : सांगलीहून प्रवास करून आलेला
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ात आणखी दोघे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. कुडाळ व वेंगुर्ले शहरात हे रुग्ण आढळले आहेत. कुडाळमध्ये कोरोनाचा शिरकाव होऊन एका पोलिसाला कोरोनाची लागण झाली आहे. तर वेंगुर्ल्यात ट्रक चालक कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. जिल्हय़ात आता कोरोना सक्रिय 27 रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
कोरोना बाधित रुग्णांची संख्या 267 वर गेली आहे. त्यापैकी 234 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एक रुग्ण मुंबईला गेला आहे. शुक्रवारी नव्याने दोन रुग्ण आढळले. त्यामध्ये वेंगुर्ले तालुक्मयातील भटवाडी येथील ट्रक चालक असून हा रुग्ण संपर्कात आलेला एक रुग्ण आहे, कुडाळ शहरात पहिल्यांदाच कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. कुडाळ पोलीस ठाण्यातील हा कर्मचारी आहे. कुडाळ-लक्ष्मीवाडी येथील हा रहिवासी असून सांगली येथून प्रवास करून आलेला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
कुडाळ करंदीकर चाळ व लक्ष्मीवाडी येथे कंटेनमेंट झोन
कुडाळ तालुक्मयातील कुडाळ करंदीकर चाळ व लक्ष्मीवाडी येथील 100 मीटर परिसर क्षेत्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सदरचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. सदर कंटेनमेंट झोनमध्ये 30 जुलै 2020 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तू विक्री बंद राहणार आहे. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे-जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱयाविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71, 139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश कुडाळ उपविभागीय अधिकारी प्रशांत पानवेकर यांनी दिले आहेत.
तपासण्यात आलेले एकूण नमुने 4576
अहवाल प्राप्त झालेले नमुने 4520
आतापर्यंत पॉझिटिव्ह नमुने 267
निगेटिव्ह आलेले नमुने 4253
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 56
सद्यस्थितीत जिल्हय़ातील सक्रिय रुग्ण 27
अन्य जिल्हय़ात तपासणीसाठी गेलेले रुग्ण 1
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 5
डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 234
विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण 53
शुक्रवारी तपासणी केलेल्या व्यक्ती 3700
संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 13058
शासकीय संस्थांमधील अलगीकरणातील व्यक्ती 35
गाव पातळीवरील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 10189
नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 2834
2 मेपासून जिल्हय़ात आलेल्यांची संख्या 136961









