वार्ताहर/ कुडची
कुडची येथे आज दि. 11 पासून ड्रोन कॅमेऱयाची नजर ठेवण्यात येत आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्याच्या दिशेने जिल्हा व तालुका प्रशासन, पोलीस आणि आरोग्य खाते विविध पावले उचलत आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. कुडची येथे कोरोनाचे चार रुग्ण आढळल्याने आवश्यक ती खबरदारी तातडीने घेतली जात आहे. अत्यावश्यक सेवा वगळता शहर आजपासूनच तीन दिवसांसाठी सीलडाऊन करण्यात आले आहे.
आज सायंकाळी तहसीलदार चंद्रकांत बजंत्री, पोलीस उपअधीक्षक एस. व्ही. गिरीश, उपनिरीक्षक शिवराज दरीगौड, मुख्याधिकारी एस. ए. महाजन यांच्यासह विविध खात्यातील अधिकारी व कर्मचाऱयांच्या उपस्थितीतच ड्रोनचा प्रारंभ करण्यात आला. त्याद्वारे शहरावर नजर ठेवली जाणार आहे. सीलडाऊन असल्याने कोणीही बाहेर पडू नये. ड्रोन कॅमऱयाच्या नजरेत आल्यास गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांना खबरदारी घ्यावी लागणार आहे.
कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊनच कुडची येथे जमावबंदी, लॉकडाऊन, सीलडाऊननंतर आता कॅमेऱयाची नजरही असणार आहे. नागरिकांच्या आरोग्य व बचावासाठी हा निर्णय घेतला असून सर्वांनी सहकार्य करावे.









