प्रतिनिधी/ कुडचडे
सध्या कुडचडेत तसेच उर्वरित राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात राज्याच्या सीमा खुल्या करण्यात आल्या आहे. याची दखल घेत कुडचडे कोरोना हॉटस्पॉट बनू नये व कुडचडेतील जनतेमध्ये कोरोनाचा जास्त फैलाव होऊ नये यासाठी कुडचडे-काकोडा पालिकेने ताबडतोब एका दिवसाचा स्वेच्छा लॉकडाऊन जाहीर करून सर्व बाजार परिसर व अन्य आवश्यक ठिकाणी निर्जंतुकीकरण करावे, अशी मागणी कुडचडे काँग्रेस गटाध्यक्ष पुष्कल सावंत यांनी नगराध्यक्ष बाळकृष्ण होडारकर यांना निवेदन देऊन केली आहे.
यावेळी युवक काँग्रेस अध्यक्ष विराज नागेकर, दक्षिण गोवा जिल्हा सचिव अली शेख, अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष इरफान किल्लेदार, उपाध्यक्ष एल्टन फर्नांडिस व पराग सबनीस आदी उपस्थित होते. सर्वांना माहिती आहे की, कोरोना महामारी ही किती जीवघेणी आहे. त्यात यापूर्वी राज्यात विविध ठिकाणी किती तरी लोकांचे प्राण गेलेले आहेत. सध्या राज्यात प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे. ती एक गंभीर गोष्ट असून सर्वत्र व्यवसाय सुरू होण्याशिवाय पर्याय नाही. त्याचबरोबर प्रत्येकाचा जीव बहुमूल्य आहे. यादृष्टीने हे निवेदन पालिकेला देण्यात आले आहे. त्याची दखल घेऊन पालिकेने ताबडतोब पावले उचलावीत, अशी मागणी सावंत यांनी केली आहे. याचबरोबर यासंबंधी कुडचडे मार्केट असोसिएशन तसेच इतर व्यापारी संघटनांना कळविण्यात आले आहे.









