घरोघरी कचरा गोळा करण्याविषयीच्या करारास मुदतवाढ, 4 पासून पालिका सोपो कर गोळा करणार
प्रतिनिधी / कुडचडे
राज्यात लॉकडाऊन लागू झाल्यानंतर मंगळवारी झालेल्या कुडचडे पालिका मंडळाच्या पहिल्याच बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली व तयार केलेल्या अंदाजपत्रकाला मान्यता देण्यात आली. कुडचडेत घरोघरी कचरा गोळा करण्यासंदर्भात जो करार होता तो जानेवारीतच संपला होता. पण त्याला आणखी तीन महिने वाढवून दिले होते. जरी लॉकडाऊन झाला तरी कचरा गोळा करणे हे आवश्यक आहे. त्यामुळे सदर कराराला आणखी तीन महिने किंवा पुढचा नवीन करार होईपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
तसेच सोपोविषयक करार हा 31 मार्चपर्यंत होता. पण लॉकडाऊन असल्यामुळे नवीन करार झाला नसल्याने बाजारात बसत असलेल्या विक्रेत्यांकडून एप्रिल महिन्यात कोणताच सोपो कर वसूल केलेला नाही. पालिका संचालकांसोबत झालेल्या चर्चेत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, सध्या बाजारात सरकारने सोशल डिस्टन्सिंग पाळून जे व्यवसाय करण्याची सूट दिली आहे त्यांच्याकडून 4 मेपासून नवीन सोपो करार होईपर्यंत कुडचडे पालिकेने सोपो कर घ्यावा, असे या बैठकीत ठरविण्यात आले.
तसेच 14 व्या वित्त आयोगाद्वारे दिल्या जाणाऱया अनुदानासंदर्भात पालिका संचालकांनी नुकताच एक निर्णय घेतला असून त्यानुसार जो निधी पालिकांना देण्यात येतो त्याचा व्यवस्थित वापर होत नसल्यामुळे त्यासाठी दोन खाती तयार करण्यात येणार आहेत. पहिल्या खात्यात केंद्राकडून येणारा निधी ठेवण्यात येईल व ज्यावेळी त्यातून केलेले कोणतेही विकासकाम पूर्ण होईल तेव्हा पहिल्या खात्यातून पैसे दुसऱया खात्यात जमा केले जातील. त्या दुसऱया खात्यातून विकासकामांची बिले फेडली जातील, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
मान्सूनपूर्व कामे पालिका करणार
याअगोदर पलिका क्षेत्रातील मान्सूनपूर्व कामांची जबाबदारी नगरसेवकांकडे सोपविण्यात यायची. त्याप्रमाणे नगरसेवक कामगार वापरून ती कामे करून घ्यायचे व त्यांना त्याचा खर्च दिला जायचा. पण यंदा लॉकडाऊन झाल्यामुळे व पावसाळाही जवळ पोहोचला असल्याने या कामांची जबाबदारी पालिका घेणार आहे. ज्या भागांमध्ये मान्सूनपूर्व कामे झालेली नाहीत त्यांचे सर्वेक्षण करून आवश्यक तेवढेच कामगार वापरून लवकरात लवकर सदर कामे पूर्ण करून घेण्याचे यावेळी ठरविण्यात आले.
तसेच घरपट्टी वसुली, बेकादेशीर घरे यावरही बैठकीत चर्चा झाली. ज्यांनी घरक्रमांकासाठी अर्ज दिले आहेत त्याच्या फायली हाताळण्यात येतील व त्यात ज्या त्रुटी असतील त्या दूर करण्यासाठी त्यांना वेळ देण्यात येईल. तसेच परवाने घेतलेली जी बांधकामे लॉकडाऊनमुळे बंद ठेवण्यात आली होती त्यांना परवान्याची मुदत वाढवून देण्याचे यावेळी ठरले. पालिका कक्षेत जर कोठेही जीवनावश्यक वस्तू न पोहोचलेले परप्रांतीय कामगार अजूनही असतील तर त्यांची माहिती पालिकेत आणून द्यावी. सदर माहितीप्रमाणे त्यांना त्या वस्तू पोहोचत्या करण्यात येतील, अशी माहिती कुडचडे पालिकेचे मुख्याधिकारी अजय गावडे यांनी बैठकीनंतर पत्रकारांना दिली.
सदर बैठकीस वीजमंत्री नीलेश काब्राल, नगराध्यक्ष बाळकृष्ण होडारकर, उपनगराध्यक्षा पिएदाद दिनीज, नगरसेवक विश्वास सावंत देसाई, श्रीकांत गावकर, सुशांत नाईक, सुजाता नाईक, प्रशिला नाईक, अपर्णा प्रभुदेसाई, जास्मिन ब्रागांझा, रूचा वस्त, टोनी कुतिन्हो, फेलिक्स फर्नांडिस, टोनी फर्नांडिस, आगुस्तीन फर्नांडिस, मुख्याधिकारी गावडे, पालिका अभियंता दीपक देसाई, अकाउन्टंट शपुंतला डॅनियल यांची उपस्थिती होती.
एपीएल कार्डधारकांना मोफत धान्य देणार : काब्राल
लॉकडाऊनच्या काळात एपीएल रेशनकार्डधारक सोडून अन्य श्रेणींतील रेशनकार्डधारकांना सरकारतर्फे जास्त धान्य देण्यात आले आहे व त्यावर सर्व जण संतुष्ट आहेत. पण कुडचडेचे आमदार या नात्याने जे एपीएल कार्डधारक आहेत त्यांनीही काही प्रमाणात मदत झाली पाहिजे असे आपणास वाटते. त्यामुळे आपण व अन्य काही समाजसेवकांनी एकत्र येऊन या कार्डधारकांना मे महिन्यात 13 किलो तांदूळ व 4 किलो गहू मोफत देण्याचे ठरविले आहे. त्याचे पैसे सरकारला देण्यात येतील, अशी माहिती वीजमंत्री काब्राल यांनी बैठकीनंतर बोलताना दिली.
दोन महिन्यांचे भाडे माफ
पलिकेच्या मालकीच्या जागांतील आस्थापनांचे एप्रिल व मे महिन्याचे भाडे माफ करण्याचा निर्णय बैठकीत घेतलेला आहे. पण ज्यांनी मार्चपर्यंतचे भाडे भरलेले आहे त्यांनाच दोन महिन्यांचे भाडे माफ करण्यात येणार आहे. अन्यथा आस्थापनांनी 30 जूनपर्यंत मार्चपर्यंतचे भाडे भरावे, मग त्यांनाही याचा लाभ मिळेल, असे काब्राल यांनी स्पष्ट केले. अनिवासी भारतीय आयुक्त नरेंद्र साईकर यांनी एक पोर्टल तयार केले असून राज्यातील जे कोणी विदेशात आहेत त्यांनी आपली सर्व माहिती या पोर्टलवर टाकावी. जेणेकरून त्यांना मायदेशी आणण्यास मदत होईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले.









