बाजार संकुल बांधकाम पाहणीप्रकरणी नगरसेवक बाळकृष्ण होडारकर यांचा आरोप : फूट घालण्याचे प्रयत्न
प्रतिनिधी /कुडचडे
कुडचडेत नुकतीच पालिका नगरसेवकांनी 90/10 या जागेतील नवीन पालिका बाजार संकुल इमारतीच्या सुरु असलेल्या बांधकामामुळे बाजूच्या इमारतींतील व्यापाऱयांना त्रास होत असल्याच्या तक्रारी आल्यामुळे भेट दिल्यानंतर जो गोंधळ माजला त्यात पूर्णता सुडाचे राजकारण सुरू असल्याचा दावा नगरसेवक बाळकृष्ण होडारकर यांनी आपल्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन केला.
कुडचडेतील प्रत्येकात भांडणे लावून स्वतःच ते मिटविण्याचे नाटक करण्यात येत आहे. जेव्हा नगरसेवक सदर इमारतीचे काम बघण्यासाठी गेले होते तेव्हा ते फक्त बाजूच्या दुकानदारांना कोणत्या अडचणी येत आहेत त्याची पाहणी करण्यासाठी गेले होते. पण त्या मुद्याला स्थानिक लोकप्रतिनिधीनी दुसरेच वळण दिले. सदर काम सुरू असताना त्यांनी यापूर्वी कधीच भेट दिली नव्हती. पण नगरसेवकांनी भेट दिल्यावर दुसऱयाच दिवशी भेट देण्यामागचा त्यांचा हेतू लोकांमध्ये फक्त फूट घालण्याचा आहे हे स्पष्ट झाले आहे, अशी टीका होडारकर यांनी केली.
त्यात त्यांनी बाजूच्या इमारतीतील दुकानदारांना चर्चेसाठी न बोलवता 90/10 जागेतील जुन्या इमारतीत ज्यांची दुकाने होती त्या व्यापाऱयांना बोलाविले. त्यात भेट दिलेले नगरसेवक सुरू असलेले इमारतीचे काम थांबवू पाहत असल्याचे सांगणे आणि व्यापाऱयांत व नगरसेवकांत फूट घालण्याचा प्रयत्न करणे हे त्यांचे पूर्वीपासूनचे सुडाचे राजकारण आहे, असा दावा होडारकर यांनी केला. पण ज्या वेळेस व्यापारी व नगरसेवकांत बाचाबाची सुरू होती त्यावेळी ते तोंड बंद करून हा वाद बघत होते हे सर्वांनी मीडियावर बघितले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
फूट घालण्याचा प्रयत्न
ज्या प्रकारे नगरसेवकांची पाहणी झाली व दुसऱयाच दिवशी लोकप्रतिनिधींनी हळूच येऊन पाहणी केली ते एक प्रकारे चांगले झाले. त्यावेळी हळूच एका दुकानात जाऊन त्यांनी, ज्या अडचणी येत आहेत त्या दूर करणार व जी हानी होईल त्याच्या भरपाईची सर्व जबाबदारी स्वतः घेणार, असे सांगितले. हे त्यांचे कार्य चांगले असले, तरी त्यांनी यावेळी कुडचडकरांमध्ये फूट घातलेली आहे व असे ते अगोदरपासून करत आलेले आहेत याची लोकांनी नोंद घ्यावी, असे होडारकर म्हणाले.
कायदेशीर सोपस्कार नीट व्हावेत म्हणून आवाज
या लोकप्रतिनिधीने बाजारातील व्यापाऱयांना सांगितले आहे की, होडारकर हे कुडचडेत होत असलेल्या फूड कोर्टचे काम अडविण्याचा प्रयत्न करत आहेत. यावर आपण सांगू इच्छितो की, फूड कोर्ट होणे हे चांगली गोष्ट आहे. पण सदर प्रकल्पाचा कोणत्याच कागदावर उल्लेख नाही. त्यामुळे आपण आवाज उठविला आहे. कारण नगरसेवक व आमदार हे कायमस्वरूपी नसतात, मात्र तेथे व्यवसाय करणारे हे कायम राहणारे आहेत व पुढे त्यांना कोणत्याच अडचणी येऊ नयेत म्हणून होणारे काम नीट कायदेशीर पद्धतीने तसेच कागदोपत्री सोपस्कार करून व्हावे अशी मागणी आपण केली आहे, असे होडारकर यांनी स्पष्ट केले.
दुसरी गोष्ट, नगरसेवकांनी केलेली पाहणी ही फक्त बाजूच्या इमारतींना व तेथे असलेल्या व्यापाऱयांना धोका निर्माण होऊ नये यासाठी नगरसेवक या नात्याने केली होती व ते स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आमचे कर्तव्य आहे हे कदाचित ते विसरले असतील. तसेच ज्या प्रकारे ते लोकांना सांगत आहेत की, सदर इमारतीसाठी ते स्वतः मनापासून प्रयत्न करत आहेत त्यावर आपण मुद्दाम सांगू इच्छितो की, त्यांच्याबरोबर ही इमारत व्हावी अशी पंधराही नगरसेवकांची मनापासून इच्छा आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ज्यावेळी ती जुनी इमारत तोडण्याचे ठरविले गेले त्यावेळेस सदर इमारतीतील व्यापारी न्यायालयात गेले होते. तेव्हा याच लोकप्रतिनिधीने त्यांना बरोबर बघून घेतो असे आपल्यासमोर म्हटले होते. तेव्हा आपण नगराध्यक्षपदावर होतो, असा दावा होडारकर यांनी केला.









