वार्ताहर / झुआरीनगर
कुठ्ठाळी उड्डाण पूल तसेच महामार्ग बांधकामाजवळील गटारांचे काम तसेच विविध इतर कामे पावसाळय़ापूर्वी पूर्ण करून स्थानिकांना उदभवणाऱया समस्या त्वरित दूर करा असा आदेश सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक पाऊसकर यांनी अधिकारी वर्ग व अभियंत्यांना दिला.
कुठ्ठाळी महामार्ग बांधकामाच्यावेळी उदभवणाऱया समस्या जाणून घेण्याठी मंत्री दीपक पाऊसकर यांनी नुकतीच या भागाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाणा, कुठ्ठाळीच्या सरपंच सेनिया परेरा, सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रमुख अभियंते उत्तम पार्सेकर, मुख्य अभियंते उमेश कुलकर्णी, कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत नाईक, सहाय्यक अभियंते महंतेश हिरेमठ, डी.बी.एल. कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक आरोग्य स्वामी, डी.बी.एलचे प्रतिनिधी रघुदत्त पंढीकर उपस्थित होते. यावेळी मंत्र्यांनी रस्त्याजवळील गटार व्यवस्थेचे निरीक्षण केले. त्याचबरोबर काही ठिकाणी अर्धवट राहिलेल्या गटार कामाचा आढावा घेत उपस्थित डी.बी.एल. तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्याशी चर्चा केली. पुठ्ठाळी जंक्शन ते कुठ्ठाळी क्रॉस दरम्यान दोन्ही बाजुनी गटाराचे काम चालू आहे. हे काम त्वरित पूर्ण करून ते गटार येथील मुख्य नाल्याला जोडणे आवश्यक आहे. घेल्या वर्षी अर्धवट कामामुळे येथील लोकांच्या घरात पावसाचे पाणी घुसण्याचे प्रकार घडले होते. याची कल्पना मंत्र्याना देण्यात आली. दुसऱया बाजुने डोंगराळ भागातून मोठय़ा प्रवाहात येणारे पाणी या गटारातून सुरळीत जाण्यासाठी लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आणून दिले. य्ािं रस्त्याच्या बाजुला शेती आहे. जर गटाराचे बांधकाम नियोजित पद्धतीने झाले नाही तर गटारातील पाणी शेतात शिरण्याची भीती यावेळी शेतकऱयांनी व्यक्त केली.
कुठ्ठाळीतील संत्रात भागातील गटार बांधकामाचीही मंत्र्यानी पाहणी केली व सर्व काम 10 जूनपर्यंत पूर्ण करून येथील समस्या त्वरित सोडवाव्या असा आदेश मंत्री दीपक पाऊसकर यांनी अधिकारीवर्ग व अभियंत्याना दिला. पावसाळय़ात स्थानिकांना खुप त्रास सहन करावा लागतो तेव्हा या कामाला प्रथम प्राधान्य देऊन ते त्वरित पूर्ण करण्यावर भर दिला जाईल असे साबांखाचे वरिष्ठ अभियंते उत्तम पार्सेकर यांनी सांगितले. पावसाची पर्वा न करता तसेच चिखलमय रस्त्यातून सर्व भागाची पाहणी केल्याबद्धल कुठ्ठाळीच्या आमदार एलीना साल्ढाणा यांनी मंत्र्याचे आभार व्यक्त केले.









