आप नेत्या अलिना साल्ढाना यांचे आश्वासन
प्रतिनिधी/ पणजी
अलिना साल्ढाना मूलभूत सुविधा, भूमिगत केबलिंग आणि अंतर्गत रस्ते प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करणार
आप सत्तेत आल्यास, कुठ्ठाळीच्या लोकांना मूलभूत सुविधा पुरविण्यावर लक्ष केंद्रित करणार, असे आश्वासन आम आदमी पक्षाच्या कुठ्ठाळीच्या उमेदवार अलीना साल्ढाना यांनी शनिवारी दिले. लोकांच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करणे तसेच अंतर्गत रस्ते आणि भूमिगत केबलिंग सुधारणे यासाठी आपले प्राधान्य असेल असेही त्या म्हणाल्या.
पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. कुठ्ठाळी मतदारसंघात आजही अनेक भागात पाण्याची समस्या आहे. लोकांना पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज आहे. एका महिन्यापूर्वी पाण्याची नवीन पाइपलाइन टाकूनही, झुआरी नगरमध्ये असे अनेक भाग आहेत जेथे दाब कमी आहे. लमाणी कॉलनीत तर पाणी टाकीत चढतच नाही. दाब कमी असल्याने पहाटे 2 किंवा 3 वाजता पाणी सोडले जाते. हे परिसरातील रहिवाशांसाठी योग्य नाही. ही समस्या सोडवण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार असून गरज पडल्यास नवीन पाइपलाइन टाकून पाणी उपलब्ध करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
माझ्या मतदारसंघातील काही गावांना भूमिगत केबल टाकण्याची गरज आहे. घरांच्या टेरेस आणि व्हरांडय़ावर केबल लटकलेल्या पाहून मला धक्काच बसला. हे धोकादायक आहे. ’आप’ला सत्ता मिळ्ल्यास भूमिगत केबल टाकण्याचे काम हाती घेण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
साल्ढाना म्हणाल्या कि, आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जनतेला आनंदी आणि शांततापूर्ण जीवन जगण्यासाठी मूलभूत सुविधा आवश्यक आहेत यावर भर दिला आहे. ते म्हणाले की, विकासाचा भाग म्हणून मोठय़ा प्रकल्पांकडे जाण्यापूर्वी, आपण प्रथम लोकांच्या गरजांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्यामुळे कुठ्ठाळी मतदारसंघातील लोकांना मूलभूत सुविधा पुरविण्यावर आमचा भर असेल.









