अन्य मालमत्तेचीही नुकसानी : आगीचे कारण संशयास्पद : लॉकडाऊनमुळे अडकली होती बोट
प्रतिनिधी / वास्को
एका खासगी कंपनीसाठी बांधण्यात आलेल्या बोटीला आग लागण्याची घटना रविवारी संध्याकाळी कुठ्ठाळीत घडली. बांधून पूर्ण सज्ज झालेले हे जहाज लॉकडाऊनमुळेच कुठ्ठाळीतील सचिदा इंजिनिरिंग वर्क्स यांच्या यार्डमध्ये अडकून पडले होते. या घटनेत दोन कोटीहून अधिक किमतीच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. अन्य एक बोट वाचवण्यात अग्निशामक दलाला यश आले.
या घटनेसंबंधी मिळालेल्या अधिक माहितीनुसार संध्याकाळी सहाच्या सुमारास ही आग लागली. लॉकडाऊन असल्याने या यार्डमध्ये घटनेवेळी कोणीही नव्हते. त्यामुळे या यार्डमध्ये आगीची घटना कशी घडली याबाबत माहिती उघड होऊ शकली नाही. सदर बोट यामीकास या कंपनीसाठी बांधण्यात येत होती. ही कंपनी सागरी पोलीस विभागासाठी गस्ती बोटी पुरवीत असते. शिवाय सदर शिपयार्डमध्ये सागरी पोलीस विभागाच्या बोटींची दुरूस्तीही करण्यात येत असते. मात्र, आगीच्या भडक्यात सापडलेल्या बोटी सागरी पोलिसांना पुरवण्यात येणार होत्या काय याबाबत नक्की माहिती मिळाली नाही.
सदर बोट फायबरची असल्याने लगेच आगीचा भडका उडाला. आगीच्या मोठमोठय़ा ज्वाळा उडू लागल्याने परिसरात भीती निर्माण झाली. या घटनेची माहिती मिळताच वास्कोसह वेर्णा व मडगावच्या शासकीय अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र पहिला बंब पोहोचण्यापूर्वीच बोटीला पूर्णपणे आगीने घेरले होते. बोटीला लागलेली आग विझवण्याचे काम रात्री नऊ वाजेपर्यंत चालूच होते. आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाचे नऊ बंब खर्ची पडले होते.
दुसरी फायबर बोट तिथेच होती. मात्र, तिचे किरकोळ नुकसान झाले. पेट घेण्यापूर्वीच अग्निशामक दलाने ही बोट त्या ठिकाणावरून दुसरीकडे हलवली. मात्र, या घटनेत एक फायबर मोल्डही जळून खाक झाला. या फायबर मोल्डपासून तिसरी बोट तयार करण्यात येणार होती.
दोन कोटीहून अधिक नुकसानीचा अंदाज या आगीच्या घटनेत एकूण किती नुकसान झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्निशामक दलाचे उपसंचालक नितीन रायकर यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत ते घटनास्थळी उपस्थित होते. दलाचे उपअधिकारी दामोदर जांभावलीकर तसेच फ्रांसिस मेंडीस घटनास्थळी हजर होते. बचाव कार्यात अग्निशामक दलाचे रामा गावडे व महादेव वरक हे दोघे कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांना पोलिसांच्या वाहनातून मडगावच्या हॉस्पिसियो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.









