ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे ग्रामविकास अधिकारी ए. एस. कठारे यांचे आव्हान
वार्ताहर / कुंभोज
कुंभोज गावचा समावेश शासनाच्या ‘माझी वसुंधरा अभियान’ या योजनेत झाला असून कुंभोज ग्रामस्थांनी सदर योजना राबविण्यासाठी पर्यावरण संरक्षण, स्वच्छ सुंदर परिसर, वृक्षलागवड, सौर ऊर्जेचा वापर, हरित कायद्याचे काटेकोरपणे पालन आदी नियमांचे काटेकोरपणे पालन करून माझी वसुंधरा अभियान यशस्वी करावे असे आव्हान कुंभोज ग्राम विकास अधिकारी ए एस कठारे यांनी केले. ते कुंभोज तालुका हातकणंगले येथे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल कुंभोज येथे माझी वसुंधरा अभियान शपथ विधी प्रार्थना प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुंभोज माजी उपसरपंच जहांगीर हजरत होते.यावेळी न्यू इंग्लिश स्कूल कुंभोजचे मुख्याध्यापक महाजन यांनी विद्यार्थ्यांच्या कडून माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत शपथ घेतली, यामध्ये पर्यावरण संरक्षणाच्या सर्व नियमांचे पालन, मी माझे घर व परिसर स्वच्छ व सुंदर ठेवीन, घरातील ओला कचरा सुका कचरा प्लास्टिक कचरा यांचे वर्गीकरण करेन, मी उपलब्ध सर्व ठिकाणी वृक्षलागवड करेन व त्यांचे संगोपन करेन ,पारंपरिक ऊर्जेचा वापर कमीत कमी करून सौरऊर्जेचा वापर करेन, घराच्या छतावरील पाणी जमिनीत मुरवून भूजलाच्या वाढीस मदत करेन, दैनंदिन जीवनामध्ये पर्यावरणपूरक साधनांचा वापर करेन, हरित कायद्याचे काटेकोरपणे पालन करेन, पर्यावरणास हानी पोहोचवणार्या कामांना व्यक्तींना वैधनिक मार्गाने विरोध करेन ,माझे गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी वर्षातील शंभर तस स्वच्छतेसाठी देईन अशी शपथ घेतली.
यावेळी माजी वसुंधरा अभियान राबविण्यासाठी कुंभोज ग्रामस्थांना ग्रामपंचायतीच्या वतीने लागेल ते सहकार्य करण्याचे आव्हान ग्रामविकास अधिकारी ए. एस. कठारे यांनी दिले. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी शांतिनाथ धरणगुते, बंटी कांबळे, राजेंद्र कुंडले, अमोल शिंदे, अमर पवार, बाळासाहेब कोळी, विनोद शिंगे सागर कांदेकर, तसेच विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.