इचलकरंजी / प्रतिनिधी
हातकणंगले येथील लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमधील एका कारखान्यात मशीनवर काम करताना अचानक व्हील तुटून अंगावर पडल्याने एका कामगार गंभीर जखमी झाला. त्यामुळे त्याला इचलकरंजी मधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला. सुभाष पितांबर भोसले (वय ४४, रा. कुंभोज, ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे. याची नोंद शिवाजीनगर पोलिसांत झाली आहे.
लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमध्ये शिवशक्ती नामक कारखान्यात सुभाष भोसले काम करीत होता. यावेळी अचानक मशीनमधील व्हील तुटून त्याचा छातीवर येवून आदळले. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्यांना उपचारासाठी इचलकरंजीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचार सुरु असताना त्याचा मृत्यु झाला. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलिसात झाली असून, पुढील तपासासाठी हा गुन्हा हातकणंगले पोलिसाच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.









