कमी खर्चात इथेनॉल निर्मिती करणार
प्रतिनिधी / वाकरे
कुंभी कासारी कारखान्याने या वर्षीच्या गळीत हंगामात साडे सहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून या उद्दिष्टपूर्तीसाठी कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांनी आपला संपूर्ण ऊस कारखान्याकडे पाठवून द्यावा, असे आवाहन करून येत्या वर्षात कारखाना कमी खर्चात इथेनॉल निर्मिती करणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन, माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी दिली. कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२०-२१ च्या ५८ व्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ प्रसंगी चेअरमन नरके बोलत होते. यावेळी ज्येष्ठ संचालक दादासो लाड (गणेशवाडी) व त्यांच्या पत्नी सौ.आक्काताई लाड यांच्या हस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन करण्यात आले.
चेअरमन नरके यांनी आगामी गळीत हंगामासाठी कारखान्याकडे ५२१२ हेक्टर लागण आणि ३४०० हेक्टर खोडवा अशी ९६१२ हेक्टर ऊस नोंद झाल्याचे सांगितले.ज्या ऊस उत्पादकांनी अद्याप ऊस नोंद केली नाही त्यांनी ती सत्वर करावी असे आवाहन त्यांनी केले. साखर उद्योगासमोरील अडचणी सांगताना गेल्या हंगामातील ११५ लाख मेट्रिक टन साखर शिल्लक असून आगामी गळीत हंगामात ३०५ लाख मेट्रिक टन साखर उत्पादन होईल असे ते म्हणाले.त्यामुळे पुढील वर्षी १६५ लाख मेट्रिक टन अतिरिक्त साखर राहील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारने ऊसाच्या एफआरपीमध्ये १०० रुपयांची वाढ केली, मात्र साखर दर प्रतिकिलो ३३ रुपये केला, तो ३७ रुपये करावा अशी मागणी त्यांनी केली.
सरकारने ६०० ते ७०० रुपये अनुदान द्यावे
केंद्र व राज्य सरकारने ऊसाची एफआरपी देण्यासाठी लागणारी प्रतिटन रुपये ६०० ते ७०० रुपये रक्कम साखर कारखान्यांना कर्ज म्हणून न देता अनुदान म्हणून द्यावी अशी मागणी चेअरमन नरके यांनी केली.
इथेनॉल निर्मिती करणार
कुंभीच्या यापूर्वीच्या वार्षिक सभेत इथेनॉल निर्मितीला परवानगी मिळाली नाही, ती मिळाली असती तर इथेनॉल निर्मिती करता आली असती, तरीही इथेनॉल प्रकल्प काळाची गरज असल्याने कमी खर्चात इथेनॉल निर्मिती करण्याचा कारखान्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.