वार्ताहर / मालवण:
कुंभारमाठ येथे वीज खांब उभा करताना दोरी तुटल्याने खांब अंगावर कोसळून देवकरण वासुदेव शहारे (35 रा. गोंदिया) या कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली.
मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कुंभारमाठ हॉटेल जानकीच्या पाठीमागे नवीन ट्रान्सफॉर्मरकडे जाणाऱया विद्युत वाहिनीसाठी विद्युत खांब उभे करण्याचे काम सुरू होते. खांब उभा करण्यासाठी सकाळी कुडाळ येथून महावितरणच्या ठेकेदाराचे कामगार आले होते. वीज वितरणच्या ठेकेदाराचे सहा कामगार खांब उभे करण्याचे काम करीत होते. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कामगार खांब उभा करीत असताना अचानक दोरी तुटली. दोरी तुटल्याने खांब देवकरण शहारे याच्या डोक्यावर कोसळला. या दुर्घटनेत देवकरण याचा जागीच मृत्यू झाला. देवकरण याच्या सहकाऱयांनी त्याला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फारणे, पोलीस कर्मचारी सुभाष शिवगण, जानकर यांनी ग्रामीण रुग्णालयात येऊन घटनेची माहिती घेतली. घटना समजताच वीज वितरणच्या कर्मचाऱयांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली होती.









