कुंदरनाडू महात्मा गांधी अर्बन बँकेतील घटना : सुदैवाने रोकडसह तारण ठेवलेले सोन्याचे दागिने सुरक्षित
वार्ताहर / यमकनमर्डी
हुक्केरी आणि गोकाक तालुक्याच्या सीमेवर असलेल्या कुंदरगी येथील कुंदरनाडू महात्मा गांधी अर्बन बँकेला शॉर्टसर्किटने आग लागून 1 कोटी 23 लाख 35 हजार रुपयांची हानी झाल्याची माहिती बँकेचे मॅनेजर सिद्रायी सुंबळ्ळी यांनी दिली. सदर आगीत संगणक, पिग्मी मशीन, कागदपत्रे आणि फर्निचर साहित्य जळून खाक झाल्याची घटना रविवार दि. 6 रोजी सकाळी घडली.
दरम्यान अग्निशमन दलाच्या तीन बंबांनी घटनास्थळी धाव घेत आग वेळीच आटोक्यात आणली. मात्र, सुदैवाने आगीमध्ये बँकेतील रोकड आणि तारण ठेवलेले सोन्याचे दागिने सुरक्षित असल्याची माहिती बँकेचे मॅनेजर सिद्रायी सुंबळ्ळी यांनी दिली.
याबाबत समजलेली माहिती अशी, हुक्केरी आणि गोकाक तालुक्याच्या सीमेवर असलेल्या कुंदरगी येथे कुंदरनाडू महात्मा गांधी अर्बन बँक आहे. सदर बँकेची स्थापना 1996-97 मध्ये करण्यात आली.
रविवारी बँकेला सुटी असल्यामुळे कर्मचारी व अधिकारी बँकेत हजर नव्हते. दरम्यान शॉर्टसर्किटने आग लागून बँकेतून धूर येत होता. रविवारी सकाळी सदर प्रकार गावकऱयांना लक्षात येताच त्यांनी याची माहिती पोलिसांना व अग्निशमन दलाला दिली.
बँक इमारतीचे मोठे नुकसान
घटनेची माहिती मिळताच पोलीस व बँक अधिकाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच अग्निशमन दलाचे बंबही दाखल झाले. हत्तरगी अग्निशमन, सतीश शुगर्स आणि हुक्केरी येथील अग्निशमन दलाने अथक परिश्रमाने आग आटोक्यात आणली. असे असले तरी बँक इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. बँकेतील संगणक, पिग्मी मशीन, कागदपत्रे आणि मोठय़ा प्रमाणात असलेले फर्निचर जळून खाक झाल्याने बँकेला 1 कोटी 23 लाख 35 हजार रुपयांचा फटका बसला अशी माहितीही बँक मॅनेजर सुंबळ्ळी यांनी दिली.
या घटनेची नोंद अंकली पोलीस स्थानकात झाली असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. यावेळी बँकेचे अध्यक्ष रामन्ना सुंबळ्ळी, उपाध्यक्ष शंकर तळवार व संचालक मंडळ उपस्थित होते. पाच्छापूर, अंकली, कुंदरगी या गावासह गोकाक आणि हुक्केरी तालुक्यातील खातेदार सदर बँकेशी नेहमी संपर्कात होते. यामुळे सदर बँक परिसरात प्रसिद्ध होती.









