शिवसैनिकांचा माऊली लॉज व्यवस्थापनाला इशारा
प्रतिनिधी / कोल्हापूर
अंबाबाई मदिर परिसरातील मनकर्णिका कुंड जागेत 10 फूट अतिक्रमण केल्याचे सरकारी मोजणीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कुंड उत्खननाच्या कामामध्ये अडथळा निर्माण न करता हे अतिक्रमण त्वरीत काढा. सोमवारपर्यंत अतिक्रण हटविण्याबाबत निर्णय कळवा, अन्यथा लॉजला टाळे ठोकण्याचा इशारा शिवसैनिकांनी जोतिबा रोडवरील माऊली लॉज व्यवस्थापनाला दिला. तसेच यावेळी कुंड उत्खनन कामामध्ये अडथळा निर्माण केल्याचा जाब विचारत शिवसैनिकांनी व्यवस्थापनाविरोधात आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी मनकर्णिका मंदिरावर लॉजची इमारत उभारली कशी, अशी विचारणा करत लॉज मालकाला चांगलेच धारेवर धरले. याप्रसंगी संबंधित मालकाकडे ना हरकत दाखला, व्यवसाय परवाना, बांधकाम परवाना दाखविण्याची मागणी केली. मात्र कागदपत्र हारवली असल्याचे सांगत महापालिकेत कागदपत्रांची मागणी केल्याचे लॉज मालकाने सांगितले. यावर शिवसैनिक चांगलेच संतप्त झाले. त्यांनी महापालिका व लॉज मालकाने संगनमताने बेकायदेशीररित्या इमारत उभारल्याचा आरोप केला. तसेच कोल्हापूरच्या दृष्टीने करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर आणि मनकर्णिका कुंडाचा विकास महत्त्वाचा आहे. यामध्ये कोणी आडवे पडण्याचा प्रयत्न करणार असेल तर तो खपवून न घेण्याचा इशारा दिला.
यावेळी जिल्हाप्रमुख विजय देवणे, माजी आमदार सुरेश साळोखे, उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शहरप्रमुख शिवाजीराव जाधव, करवीर तालुका प्रमुख विराज पाटील, युवासेनेचे हर्षल सुर्वे, जिल्हाध्यक्ष मंजीत माने, शशीकांत बिडकर, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख स्मिता सावंत-मांडरे, गीतांजली गायकवाड, दिपाली शिंदे, वैशाली घेवारे, पुजा शिंदे, करुणा सुतार आदींसह शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.
कन्नड फलकांना काळे फासले
आंदोलना दरम्यान मंदिर परिसरातील काही लॉज चालकांनी कन्नड भाषेत फलक लावल्याचे शिवसेनेच्या निदर्शनास आले. फलकांबाबत तीव्र संताप व्यक्त करत येथील एक फलक शिवसैनिकांनी हटविला. तर महिला पदाधिकाऱयांनी भींतीवर कन्नड भाषेत लिहिलेल्या नावला काळे फासले. जिल्हाप्रमुख पवार यांनी कर्नाटक सरकार मराठी भाषिकांवर अन्याय करते, सीमाभागातील मराठी बांधवांवन दडपशाही केली जाते. तेथे मराठी फलक चालत नाहीत, मग तुम्ही येथे कन्नड भाषेत फलक उभारलेच कसे असे सुनावत हा प्रकार कधीही खपवून घेणार नाही असे सांगितले. तसेच येथून पुढे कन्नड फलक दिसल्यास संबंधित लॉज व्यवस्थापनाला शिवसेना स्टाईलने उत्तर देण्याचा इशारा पवार यांनी दिला.









