प्रतिनिधी/ कुंकळ्ळी
आपण 12 हजार मते मिळवून विजयी होणार असल्याचा दावा कुंकळ्ळीचे आमदार आणि कुंकळ्ळीतील भाजप उमेदवार क्लाफासियो डायस यांनी समर्थकांच्या उपस्थितीत पत्रकारांशी बोलताना केला. पुन्हा भाजपचेच सरकार सत्तेवर येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पूर्ण सहकार्याने गोव्याला पुढे नेण्यासाठी समर्थपणे वावरणार. यासाठी मतदारांचा कौल भाजपलाच असेल, असा दावाही डायस यांनी केला. डायस यांनी आपला उमेदवारी अर्ज मंगळवारी मडगावातील निवडणूक अधिकारी कार्यालयात सादर केला.
यानंतर पत्रकारांशी बोलताना डायस म्हणाले की, भाजपात गेल्याने मी विकासकामे करण्यात यशस्वी झालो. भाजपात गेल्याचे समाधान वाटते. मतदारांना निवडणूकपूर्व जी आश्वासने दिली होती त्यातील 80 टक्के पूर्ण झाली आहेत, तर इतर कामे कोविडमुळे परिणाम झाल्याने पूर्ण व्हायची राहिली आहे. मात्र ही राहिलेली कामेही पूर्ण होतील. मतदारांची मान्यता घेऊनच मी भाजपात गेलो. जे आरडाओरडा करणारे आहेत त्यांनी काय केले, असा सवाल पत्रकारांच्या एका प्रश्नावर बोलताना त्यांनी केला. आरडाओरडा करणाऱयांनी तीन वेळा उडय़ा मारल्या. तुम्हीच काय ते त्यांना विचारा, असे ते म्हणाले.
यापुढेही भाजपातच राहीन
काँग्रेसमध्ये असताना आपली कामे युरी आलेमाव, विजय सरदेसाई अडवत होते. मात्र भाजपात गेल्यामुळे अडीच वर्षांत बरीच कामे पूर्ण करण्यात यशस्वी झालो. यापुढेही मी भाजपातच राहीन. या निवडणुकीत हिंदू, मुस्लिम व ख्रिस्ती मतदार माझ्यामागे ठामपणे आहेत. मी जो विकास केला आहे तो सर्वांसमोर असून मतदारांचा पूर्ण विश्वास माझ्यावर आहे. या निवडणुकीत ते मलाच पावती देतील, असा विश्वास डायस यांनी व्यक्त केला.
यावेळी गिरदोली जिल्हा पंचायत सदस्य संजना वेळीप, कुंकळ्ळी भाजप मंडळाचे अध्यक्ष मारूती देसाई, सचिव संदीप हरमलकर, प्रभारी राजू कोराडी, नगरसेवक विदेश देसाई, विशाल देसाई, राहुल देसाई, रूपा गावकर व पोलिता कारनेरो तसेच महम्मद मन्सूर, सुनयना नाईक गावकर, बाळळी सरपंच राजू गोसावी, पंच प्रतिमा नाईक, विष्णू नाईक, राज्य भाजप मंडळाच्या सदस्य अलका पोतदार, युवा मोर्चा अध्यक्ष संदीप देसाई, माजी उपनगराध्यक्ष मारियो मोराईस, भाजप सरचिटणीस नरेंद्र सावईकर, दक्षिण गोवा भाजप उपाध्यक्ष व कुंकळ्ळी महिला मोर्चा अध्यक्षा जॉर्जिना गामा व इतर समर्थक उपस्थित होते.
सकाळी डायस यांनी फातर्पा येथील श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण संस्थानला भेट देऊन आशीर्वाद घेतला. त्यांचे देवस्थान समितीचे ऍटर्नी रमेश देसाई यांनी पुष्पहार घालून स्वागत करताना विजयाचा विश्वास व्यक्त केला. डायस यांनी श्री शांतादुर्गा बाळळीकरीण, कुंकळ्ळी चर्च, उस्किणीबांध येथील श्री आजोबा यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. तसेच चांदर येथील चर्च आणि श्री चंदेश्वर भूतनाथ देवस्थानात दर्शन घेऊन श्रींचा आशीर्वाद घेतला.









