आरोपीचा शोध लावण्यात पोलिसांना अपयश
प्रतिनिधी / मडगाव
कुंकळी औद्योगिक वसाहतीत काम करणाऱया एका सुरक्ष रक्षकाचा खून करण्यात आला. आरोपी फरारी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खुनाची ही घटना 23 नोव्हेंबर रोजीच्या मध्यरात्रीच्या सुमारास घडली. सिद्दरामाय्या वंडाल (66) हा कर्नाटकातील बागेवाडी येथील इसम कुंकळी येथील औद्योगिक वसाहतीत सुरक्षा रक्षक म्हणून कामाला होता.
‘बोट क्राफ्ट’ या आस्थापनाच्या आवारात असताना हा खून झाला. 23 रोजी मध्यरात्रीच्या सुमाराला हा सुरक्षा रक्षक वरील जागी खुर्चीवर बसून आपली डय़ुटी करीत होता. मध्यरात्रीनंतर कधीतरी या सुरक्षा रक्षकाला डुलकी लागली आणि हीच संधी घेऊन एका अज्ञात हल्लेखोराने या सुरक्षा रक्षकाच्या डोक्यावर अवजड वस्तूचा आघात करुन खून करण्यात आला.
या आस्थापनात दोन सुरक्षा रक्षक होते. एक आसाम येथील लक्षी बासुमतार (46) आणि सिद्दरामय्या वंडाल (66). पहिला रक्षक दिवसपाळीला तर मयत सिद्दरामय्या वंडाल रात्रपाळीला.
या आस्थापानात काम करणारा एक कामगार 24 रोजी सकाळी या आस्थापनात जाण्यासाठी आला तेव्हा गेट बंद असल्याचे पाहून सुरक्षा रक्षकाकडे आला तेव्हा खुर्चीवर बसलेल्या स्थितीत असलेल्या सिद्दरामय्या याच्याकडे येऊन गेटची चावी मागितली तेव्हा सिद्दरामय्या याच्या नाकातून रक्त येत असल्याचे आढळून आले.
त्यानंतर या कामगाराने आस्थापनाचे मालक जॉन फर्नाडिस यांना कल्पना दिली. त्यानंतर ऍम्बूलन्स आली आणि त्यातील कर्मचाऱयांनी सिद्दरामय्या दगावला असल्याची माहिती दिली.
त्यानंतर ही माहिती कुंकळी पोलिसांनी समजताच पोलीस घटनास्थळी आले व तपास सुरु झाला. सध्या पुंकळी पोलिसांनी अज्ञात संशयिताविरुद्ध या खून प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या 302 कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. बुधवारी रात्री कुंकळी पोलिसांकडे संपर्क साधून या खून प्रकरणी संशयित आरोपी सापडला का अशी विचारणा केली तेव्हा या खून प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.









