कला-संस्कृती मंत्री गोविंद गावडेयांचे प्रतिपादन
वार्ताहर/ सावईवेरे
कीर्तन हे एक चालते बोलते ज्ञानपीठ असून उत्कृष्ट प्रबोधन करण्याचे माध्यम आहे. कीर्तनाच्या पारायणातून मुलांना उत्कृष्ट संस्कारासह ज्ञान संपादन केल्यास सुसंस्कारीत पिढी निर्माण होईल, असे प्रतिपादन कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी केले.
वळवई येथील श्री गजांतलक्ष्मी संस्थान व तारी सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने गोमंतक संत मंडळ संचलित कीर्तन विद्यालय यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या चार दिवशीय 27 व्या निवासी कीर्तन संस्कार प्राशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. तारी सोसायटीच्या सभागृहात सोहळा संपन्न झाला. यावेळी कीर्तनकार ह.भ.प. सुहासबुवा वझे, गजांतलक्ष्मी देवस्थानचे अध्यक्ष मधुसुदन तारी, तारी सोसायटीचे अध्यक्ष रत्नाकर तारी, पत्रकार नरेंद्र तारी उपस्थित होते.
पुढे बोलताना मंत्री गावडे म्हणाले की संतांनी कीर्तनाच्या माध्यमातूनच भारतीयावर चांगले संस्कार निर्माण केले म्हणूनच विनोबा भावे, सुभाषचंद्र बोस, स्वामी विवेकानंद यासारखे राष्ट्रीय प्रेमाने ओतप्रेत भरलेली माणसे घडली. त्यासाठीच अशा मार्गदर्शक शिबिरांची गरज असून अशा शिबिरांना कला व संस्कृती खात्यातर्फे सर्वतोपरी मदत करण्यासाठी मी कटीबद्ध आहे. गोव्यात नवोदीत कीर्तनकार तयार व्हावेत यासाठी ह.भ.प. सुहासबुवा यांच्या मार्गदर्शनाखाली गोमंतक संत मंडळाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले.
यावेळी वळवईतील ज्येष्ठ कलाकार विनायक वळवईकर, आत्माराम तारी, डॉ. किशन किनरे व सागर भट यांचा मंत्री गोविंद गावडे यांच्याहस्ते श्रीफळ, पुष्पगुच्छ, शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. विनायक वळवईकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सुहासबुवा वझे म्हणाले की द्वेष, हेवेदावे, जातीभेद, मत्सर आज शिगेला पोचला असून यावर नियंत्रण राखण्यासाठी युवापिढीला संस्काराची अंत्यत गरज आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दामोदर कामत यांनी केले. नरेंद्र तारी यानी आभार मानले.









