पं. जितेंद्र अभिषेकी बुवांचे गाणे ऐकत असताना अन्य काही विचार मनात येणार असलेच तर ते गाणे संपेपर्यंत अर्थातच ते आपखुशीने संपूर्ण क्वारंटाइन होऊन राहतात. काही संधीच नाही विचार करायला. सगळेच्या सगळे लक्ष ओढाळपणे त्या गाण्याकडेच लागणार! ते गाणे संपल्यावर मग सगळे मोहोळ उठते डोक्मयातले. की अरेच्चा…. संगीत म्हटले की फक्त ख्याल गायकी एवढे थोडेच आहे? उपशास्त्रीय, लाइट, कव्वाली, गजल सगळेच आहे! आणि यातले जवळपास सगळेच प्रयोग एका संगीतप्रकारात करावे लागतात. वर आणखी आर्या, ओवी, साकी, दिंडी अशी सगळी फौजही दिमतीला हजर करावी लागते. एकेका पदाला दरवेळी वेगवेगळी चाल असावी लागते. हा उद्योग करणाऱया माणसाकडे उत्तम वक्तृत्व कला असावीच लागते. पावलात नृत्य असावे लागते. देहात अभिनयाची वस्ती जमलेली असावी लागते. अंगात ठेके भिनावे लागतात. गळय़ातले सूर कच्चे असून तर चालणारच नाही. आणि ही सगळी कसरत एकटय़ाने करायची असते तीही पूर्ण तीन तास उभे राहून! वर बक्षीस म्हणून लोक चिकित्सा करायला उभेच (बसलेले असूनही हं!) असतात की गाणे बरे आहे पण बोलताना पाल्हाळ किती तो! किंवा बोलणे चांगले हो! पण गाण्याचे अंग अजिबातच नाही माणसाला. कशास उभा राहिला मग? असा हा अतिकठीण संगीत प्रकार. म्हटले तर संगीतिका आणि म्हटले तर संगीत नाटकांची जननी! हेच हरिनाम संकीर्तन अर्थातच कीर्तन! जे छान जमल्यावर जो सन्मान लोक देतात ते बघून कोणाही गायकाने हेवा करावा. ज्याचा रियाज प्रामाणिकपणे करणाऱयाकडे मोठमोठय़ा शास्त्रीय संगीत अभ्यासकांनी संदर्भ हवा म्हणून यावे. ज्याच्याकडे भक्तिगीते आणि अभंगाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयत्यावेळी दिले तरी भल्या भल्या प्रोफेशनल अँकरनी कानाला हात लावावा. सगळे काही असलेतरी अशी प्रासादिकता आमच्या गाण्यात कधी येईल रे देवा असा विचार ऐकणाऱया गायकांच्या, साथीदारांच्या मनात गुंजावा. अमुक बुवांना खूपवेळा साथ करूनच मी खरा शिकलो असे कृतज्ञतेने अनेक संगतकारांनी ज्याला गौरवावे अशी असते नारदाच्या गादीची महती!
गाणे, निरूपण, हरिनाम गुणगान, उपदेश, अभिनय आणि नृत्यही, एकाच ठिकाणी एकाच प्रकारात अनुभवायला मिळते ते कीर्तनातच! श्रोत्यांचे कान तयार करणे, अभ्यासक्रमात कडू वाटणाऱया सगळय़ा अलंकार आणि वृत्तांच्या प्रेमात शिकणाऱया मुलांना वेडं करणे, गावाखेडय़ातल्या संगीतप्रेमींना अभिजात संगीताची मेजवानी देणे हे सगळे काही एक चांगला कीर्तनकार करीत असतो. खरेतर सगळय़ा भारतभर या ना त्या नावाने कीर्तन प्रचलित आहे. पुलंचे ‘वंगचित्रे’ वाचताना बंगाली कीर्तनिया आणि त्याचे प्रत्युत्पन्नमति कवी असणे, गाण्याच्या आनंदात स्वतःतच दंग होऊन देहभान विसरून नाचणे, नवीन आखोर (अक्षर-पद या अर्थी) रचणे याचे त्यांनी केलेले वर्णन मला अजूनही विसरता येत नाही. आणि त्या ओळी तरी किती सुंदर!! ‘आमार चाँदबदनी राधा ठुमकी ठुमकी चली जाय’. ‘हम दिल दे चुके सनम’ या सिनेमात तर चक्क गुजराती राजस्थानी भागात होणाऱया कीर्तनाचाही उल्लेख येतो. यूपी बिहारलाही कीर्तन हा प्रकार आहेच. तपशिलाचा फरक काय असेल तो! कर्नाटकसह दक्षिण भारतातही कीर्तन लोकप्रिय आहे. महाराष्ट्रात कीर्तनाचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे नारदीय कीर्तन आणि दुसरे वारकरी कीर्तन. अखंड जनसागरात वाळवंटात रंगणारी वारकरी कीर्तने म्हणजे ‘अवघा रंग एक झाला’ची उदाहरणेच. कोकणात नारदीय कीर्तनाची परंपरा प्रामुख्याने आहे. गावागावातल्या देवळांमधून विविध प्रकारचे उत्सव साजरे केले जातात. त्या निमित्ताने पाच, सात, नऊ दिवस, अगदीच शक्मय नसल्यास गेलाबाजार एक दिवसतरी कीर्तन असतेच. पण ‘गाणे’ असे म्हटले की मला कीर्तनच आठवायचे लहानपणी. आता मागे वळून पाहिल्यावर कळते की गाणे या विषयाचे सौंदर्य, गांभीर्य आणि वैविध्य कीर्तनातून नकळत पदरात पडत गेले. आम्हाला तेव्हा काहीच कळत नसताना आम्ही कीर्तनातले गाणे ऐकून खरोखरच श्रीमंत झालो. आमची झोळी त्या बुवांनी किती भरली होती हे मग कळले. संगीत नाटक हा विषय कीर्तनातूनच जन्माला आला तो असाच काय? सलग 10-15 वर्षे ऐकलेले गोव्याचे बर्वेबुवा, त्यांचे ते ‘वंदू तुला प्रणवा ओंकारा’ हे पद, तसेच ते जोशी बुवा. त्यांनी केदारमधली ‘कंगनवा मोरा’ बंदिश म्हटली होती. तेव्हा ती आयुष्यात पहिल्यांदा ऐकली होती मी. काही बुवा पद म्हटल्यावर, आख्यान सांगताना ओघाने रागांची नावे, ठेके यांची सुंदर माहिती द्यायचे. उद्धव जावडेकरबुवांचे कीर्तन एकदा आमच्या गावात झाले होते. तेव्हा अशी बरीच माहिती त्यांनी ओघाओघात दिली होती. काही कीर्तनातून अत्यंत श्रवणीय अशी पखवाजची साथ असे. त्या बोलांनी तयार झालेले वातावरण मनात अजून तसेच आहे. मकरंदबुवा रामदासी, ढोलेबुवा, काणेबुवा, आफळेबुवा, बुरसेबुवा अशी ही यादी संपायचीच नाही. प्रत्येकाची शैली निराळी पण ऐकणाऱयाचे कान आणि मन श्रीमंत होणारच हे निश्चित! हिरे मिळतील की मोती बरसतील एवढाच काय तो फरक. बाकी उधळली जायची ती शब्दांची, स्वरांची रत्नेच!
कीर्तनसूर्य हभप कै. दत्तदास घागबुवा हे क्षेत्रातले प्रात:स्मरणीय व्यक्तिमत्त्व, त्यांचे ते कमाल गाणे, अफाट व्यासंग, तेजस्वी वक्तृत्त्व, विनम्रता, साधेपणा! कातळाच्या काळजातून मधुर पाणी स्रवत राहावे तसे त्यांचे कीर्तन म्हणजे कीर्तनगंगा असे. एकदा का ते ‘ये रे कृष्णातीरीच्या वसणाऱया’ सुरू झाले की ‘स्मरता दर्शन देणाऱया’चे चित्र मन:चक्षुंसमोर उभे राहून सारी कीर्तनसभा त्या चांदण्यात विरघळून जात असे. साथीचा, साथीदारांच्या कलेचा आनंद घेत घेत ते गात असत. त्यांना अगदी मोकळेपणाने दाद देत असत. त्यांनी साथीदारांना कधी अडचणीत आणले नाही की कधी सांगीतिक कुस्ती खेळली नाही. बरेचसे पेटीवादक गाणारेही असतात. अशा लोकांची तर ते गाण्याचीही साथ घ्यायचे. त्यांच्या सुराचे इतक्मया मायेने कौतुक करायचे की बाकीचे जळतच असतील. ‘हरि मजला चालवेना’ केव्हाही ऐका, थकलेली द्रौपदी आलीच पाहिजे डोळय़ांसमोर! कितीतरी पदे, अभंग, समयोचित नाटय़गीतेही आम्ही त्यांच्याकडून ऐकली आहेत. ती सर्व प्रकारची गाणी आता ऐकली की जाणवते की जशी बैठकीतील नाटय़गीते ही नाटकात गाताना त्याचे वळण बदलते तसाच कोणताही गीतप्रकार कीर्तनात कशाप्रकारे यावा आणि मूळ आकृतिबंध त्याचा वापर करून कसा नटावा हे त्यांचे कीर्तन ऐकणाऱया जिज्ञासूला अनुभवायला मिळत असे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बुवा गाताना इतके तन्मय होत असत की ऐकणाऱया प्रत्येकाला वाटत असे की बुवा माझ्याचसाठी गात आहेत. त्यांच्या विशुद्ध अंतःकरणामुळे आणि अनन्यसाधारण भक्तिभावानेच की काय, कुठेच न अनुभवलेली प्रासादिकता त्यांच्या कीर्तनात हात जोडून उभी असे. त्यांच्या प्रवाही कथनशैलीसाठी तर वेगळा लेख लिहावा लागेल. नारदाच्या गादीची शोभा खरोखरच शतगुणित करणारे असे हे व्यक्तिमत्त्व! लिहावे तेवढे कमीच! कलाविश्वातल्या सर्वांवर गारुड करणारे पं. जितेंद्र अभिषेकीबुवा यांचे वडीलही एक उत्तम कीर्तनकारच होते! जुन्या पिढीतील बहुआयामी कलाकार गोविंदराव टेंबे यांनीही कीर्तनाला साथ करूनच आपल्या छंदाची सुरुवात केली होती! आणि अशी कितीतरी उदाहरणे आहेत. म्हणजे कीर्तन हा संगीतप्रकार कलारत्नांची गंगोत्रीच म्हणावा काय?
अपर्णा परांजपे-प्रभु