रोहित ताशिलदार: गडहिंग्लज/प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हय़ात प्रधानमंत्री ‘किसान सन्मान’ योजना चालू होवून जवळपास दोन वर्ष संपली आहेत. अटी-शर्ती नुसार काही पात्र शेतकऱयांना योजनेच्या हप्ताप्रमाणे पैसे थेट खात्यावर जमा झाले. परंतू जिल्हय़ातील 49 हजार 430 शेतकरी या योजनेतील लाभापासून अद्याप वंचित आहेत. कोरोनाच्या महामारीत उध्दवस्त झालेल्या बळीराजाला खात्यात त्रुटी असल्याची कारणे दाखवत बाजूला राहिलेल्या शेतकऱयांना आपला हप्ता कधी मिळणार ? याकडे डोळे लागले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 व्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘किसान सन्मान’ योजनेची घोषणा केली होती. प्रत्येकी शेतकऱयाला महिन्याला पाचशेप्रमाणे वर्षाला सहा हजार रूपये सन्मान निधी देण्यात येतो. या योजनेसाठी जिल्हय़ातील 5 लाख 32 हजार शेतकऱयांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 4 लाख 82 हजार 570 पात्र ठरले असून त्यांना आजअखेर लाभ मिळाला आहे. पण उर्वरित 49 हजार 430 शेतकऱयांच्या नोंदणीमध्ये दुरूस्ती आढळल्याने खाती फेरतपासणीसाठी परत पाठविली आहेत.
या खात्यांतील त्रुटी दुरूस्तीचे काम सुरू असून लाभार्थ्यांचे बँक खाते क्रमांकात चुक, बँकेत आधार लिंक नसणे किंवा आधार कार्डावरील नावात चुक, ऑनलाईन बाहेरून भरलेले अर्जात त्रुटी, काहीच्या नावात बदल असल्याच्या त्रुटी दाखवत आहेत. गेल्यावर्षी महापूर आणि चालूवर्षी कोरोनाच्या महामारीत शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून योजनेतील त्रुटी दुरूस्तीचे काम संथगतीने सुरू असल्याने पुढील हप्ता जमा कधी होईल याकडे लाभार्थी शेतकऱयांचे लक्ष लागून राहिले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधान मोदी यांनी अनेक लोकोपयोगी योजनांची घोषणा केली त्यावेळी एप्रिल महिन्यात पात्र लाभार्थ्यांना शेवटचा हप्ता जमा झाला होता. कोरोना आणि दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या बळीराजाला ‘किसान सन्मान’ योजनेतील त्रुटीमुळे अडकलेला हप्ता मिळण्याची चिंता सतावत आहे.
पात्र एकही शेतकरी वंचित राहणार नाही
लॉकडाऊन शिथिल झालेनंतर तृटी दूर करण्याचे काम सुरु झाले आहे. पात्र एकही शेतकरी वंचित राहणार नाही. याची दक्षता घेतली जात आहे. कृषी संजीवनी सप्ताहाच्या काळात याबाबत शेतकऱयांच्या शंकांचे निरसन केले जाणार आहे.
ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा कृषी अधिक्षक
दुरूस्तीच्या प्रतिक्षेतेतील शेतकरी
शाहुवाडी 4393, पन्हाळा 3294, हातकणंगले 5072, शिरोळ 5058, करवीर 7219, गगनबावडा 522, राधानगरी 3444, कागल 5393, भुदरगड 3259, आजरा 2379, गडहिंग्लज 3585, चंदगड 3759.
(24 जून पर्यंतची आकडेवारी)