कर्ज स्वरुपात 5 कोटी 39 लाख रुपयांचे वाटप : रकमेबाबत सिंधुदुर्ग सागरी जिल्हय़ात अव्वल : लाभार्थी संख्येत रायगड अग्रेसर
मालवण:
केंद्र सरकारच्या किसान क्रेडिट योजनेंतर्गत जिल्हय़ातील 303 मच्छीमारांना 23 बँकांमार्फत 5 कोटी 39 लाख 35 हजार 500 रुपये कर्ज स्वरुपात रक्कम प्राप्त झाली आहे. रकमेबाबत सागरी जिल्हय़ांमध्ये सिंधुदुर्ग अव्वल ठरला आहे. लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ बऱयापैकी मिळवून दिल्याबद्दल सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालय सिंधुदुर्गचे कौतुक होत आहे.
केंद्र सरकारने फेबुवारी 2019 मध्ये किसान क्रेडिट कार्ड योजना जाहीर केली. लाभार्थ्यांची संख्या पाहता, सागरी जिल्हय़ांमध्ये रायगड जिल्हय़ाने किसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत भरीव कामगिरी केली. रायगड जिल्हय़ामध्ये लाभार्थी संख्या सर्वाधिक 1002 आहे. रायगडमध्ये 4 कोटी 38 लाख 48 हजार इतकी रक्कम कर्ज स्वरुपात मंजूर करण्यात आली. सिंधुदुर्गमध्ये 303 लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला. मात्र, लाभार्थी संख्या तुलनेने कमी असूनही सिंधुदुर्ग रकमेच्या बाबतीत अव्वल आहे. किसान क्रेडिट कार्ड योजनेला जिल्हय़ात सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. पालघर जिल्हय़ात 49 लाभार्थ्यांना 35 लाख 24 हजार, तर ठाणे जिल्हय़ात 127 लाभार्थ्यांना 16 लाख 50 हजार आणि रत्नागिरी जिल्हय़ात 201 लाभार्थ्यांना 1 कोटी 76 लाख 62 हजार इतकी रक्कम कर्ज स्वरुपात मंजूर झाली आहे.









