प्रतिनिधी / आटपाडी
कृषी कायद्याच्या समर्थनात काढण्यात आलेल्या किसान आत्मनिर्भर यात्रेच्या उद्या रविवारी होणाऱ्या सांगता सोहळ्यात आटपाडी तालुक्यातील कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पंचायत समितीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख यांनी केले आहे.
वाळवा तालुक्यात किसान आत्मनिर्भर यात्रेला सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारने शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून कृषि कायदे केले आहेत. त्याच्या बाजूने शेतकऱ्यांशी संवाद साधत कृषी कायद्याचे महत्व पटवून दिले जात आहे. रविवारी इस्लामपूर येथे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व मान्यवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आटपाडी तालुक्यातील भाजप कार्यकर्ते आणि शेतकरी यांनी या आत्मनिर्भर यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन माजी सभापती हर्षवर्धन देशमुख यांनी केले आहे.








