प्रतिनिधी / सातारा
वाई तालुक्यातील पांडवगडाच्या दक्षिण बाजूस तीन अपरिचित प्राचीन बौद्धकालीन लेणी आढळून आलेली आहेत. पांडवगडाच्या दक्षिण दिशेला आणि मेणवलीच्या उत्तर बाजूच्या डोंगर उतारावर ही तीन लेणी खोदण्यात आलेली आहेत. यातील दोन लेण्या शेजारी-शेजारी कोरलेल्या असून त्यातील डाव्या बाजूची क्रमांक १ च्या लेणीचे माप २१(रुं)x२१(लां) फूट असून यामध्ये उजव्या बाजूला चौकोनात बसण्यासाठी बाक कोरलेला आहे. शेजारी डाव्या बाजूला एक खोली कोरलेली असून यामध्ये बाक कोरलेला आहे. खोलीच्या डाव्या बाजूस शेजारी पुन्हा चौकोनात एक बाक कोरलेला आहे. लगेचच शेजारी अजून एक खोली कोरलेली आहे.
या लेणीच्या शेजारीच क्रमांक २ ची लेणी असून या लेणीचे माप २५(रुं)x२२.५(लां) फूट असून लेणीच्या मधोमध एक खोली कोरलेली असून यामध्ये बसण्यासाठी बाक कोरलेला आहे. या लेणीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला लांबसडक मोठे दोन बाक कोरलेले आहेत. सदर १ आणि २ क्रमांकांच्या लेण्या एकमेकांच्या शेजारी-शेजारी असून दोन्ही लेण्यांच्या मध्यावर सुरुवातीच्या तोंडाच्या बाजूवर एका चौकोनात बाक कोरलेला आहे. लेण्यांच्या तोंडाच्या भागाची कालानुरूप पडझड झालेली आहे. पडझड झालेल्या दर्शनी भागात अजून काही बाक आणि पाण्याची पोढी बुजली गेली असण्याची शक्यता आहे. लेण्यांच्या कातळातून पाणी पाझरून दगड पूर्णपणे ठिसूळ झालेला आहे आणि चिरा पडलेल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकाची लेणी या दोन लेण्यांपासून पूर्वेला साधारणतः पाऊण किलोमीटरवर आहे.
ही लेणी थोडी आडवाटेवर असल्यामुळे शोधणे थोडे कठीण जाते. क्रमांक ३ च्या लेणीचे माप १९(रुं)x३०(लां) फूट असून यामध्ये उजव्या बाजूला आयताकृती चौकोन कोरलेला आहे. पण यामध्ये बाक कोरलेला दिसत नाही. डाव्या बाजूच्या भिंतीमध्ये कोरायला घेतलेले काम अर्धवट अवस्थेत आहे हे स्पष्ट दिसते. पुढे दगडात मोठी आयताकृती खिडकी आणि दरवाजा कोरलेला दिसतो सद्यस्थितीत याची पडझड झालेली आहेत. येथून पुढे उजव्या बाजूला आयताकृती चौकोनात बाक कोरलेला आहे. डाव्या बाजूच्या भिंतीवर अर्धवट कोरून सोडलेलं काम दिसते. लेणीच्या मधोमध एक चौकट कोरलेली आहे. चौकटीच्या आतील खोलीचे काम अर्धवट सोडून दिलेले दिसते. बहुदा त्यावेळेच्या कारागिरांना उत्तम प्रतीची दगड या लेणीत लागला नसावा. त्यामुळे बरिचशी लेण्यातील कोरीव कामे अर्धवट सोडलेली दिसतात.
या संपूर्ण लेण्यांची शैली जर बघितली तर हीनयान बौद्ध प्रकारातील दिसून येते. सातवाहन काळात इसवी सन दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकात लेण्या कोरल्या गेल्या असाव्यात. या तिन्ही लेण्यांमध्ये चौकोनी बाक आणि खोल्या कोरलेल्या आहेत. यालाच शून्यागार (ध्यान खोल्या) म्हणतात. या अपरिचित लेण्या भटकंती सह्याद्रीची परिवार, वाई यांनी उजेडात आणलेल्या असून, लेण्यांची भारतीय पुरातत्व विभागाकडे नोंद नाही. परिवाराच्या वतीने लेण्यांचे डॉक्युमेंटेशन करून, नोंदणी प्रक्रियेचे काम चालू आहे. या अपरिचित लेण्या नव्याने उजेडात आल्याने वाई परिसरातील लेणी अभ्यासात भर पडणार आहे.
पांडवगड आणि किल्ल्याचा डोंगर परिसर प्राचीन असून पूर्वेला रेणुसेवस्ती (वाघमाळ) जवळ दोन लेणीसमूह नुकतेच नव्याने उजेडात आलेले आहेत. तसेच गडाच्या परिसरात अजून काही ऐतिहासिक गोष्टी लपलेल्या असून त्या शोधून, त्याचा अभ्यास करून उजेडात आणण्यासाठी परिवाराच्या वतीने प्रयत्न चालू आहेत. सदर लेण्यांची अवस्था दयनीय असून, लेण्यांमध्ये दगड-माती-गाळ साचलेला आहे. तसेच लेण्यांचा खडक ठिसूळ झाल्याने भरपूर ठिकाणी पडझड झालेली आहे. पुरातत्त्व खात्याने लेण्यांमध्ये उत्खनन केल्यास भरपूर प्राचीन अवशेष मिळू शकतात. यातून लेण्यांचा व तत्कालीन संस्कृतीचा अभ्यास करता येईल. हा आपला ऐतिहासिक वारसा जिंवत ठेवायचा असेल तर महाराष्ट्र पुरातत्व विभागाने लेण्यांच्या जतन आणि संवर्धनाकडे लवकरात लवकर लक्ष दिले पाहिजे, अशी माहिती भटकंती सह्याद्री परिवाराने दिली.