जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची माहिती
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ातील सर्व ऐतिहासिक वास्तू, किल्ले, दुर्ग, स्मारके, ग्रंथालये पर्यटक व नागरिकांसाठी खुली करण्याची परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे.
राज्य शासनाने लॉकडाऊनमध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता आणल्यामुळे प्रथम सिंधुदुर्ग किल्ला खुला करून पर्यटकांना जाण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर विजयदुर्ग किल्ल्यासह जिल्हय़ातील सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांना खुली करण्याची मागणी विविध संस्था, संघटना व लोकप्रतिनिधींनी केली होती. जि. प. च्या स्थायी समिती सभेत राजेंद्र म्हापसेकर व रणजीत देसाई यांनी ठरावही मांडून जिल्हाधिकऱयांना पाठवला होता.
दरम्यान, शासनाने आता मंदिरे खुली केली आहेत. तसेच लॉकडाऊनमध्ये बरीच शिथिलता आणली. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हय़ातील सर्व ऐतिहासिक वास्तू, किल्ले, दुर्ग, स्मारके, ग्रंथालये पर्यटक व नागरिकांना खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱयांनी दिली. या बाबतचे आदेश मंगळवारी काढण्यात आले.
सर्व ऐतिहासिक किल्ले, वास्तू, दुर्ग, स्मारके, ग्रंथालये खुली केली असली, तरी पर्यटक व नागरिकांना कोविडच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे, वेळोवेळी हात धुणे, सॅनिटाईज करणे या नियमांचे पालन करावे लागणार असल्याचे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.









