वनविभागाकडून कारवाई करण्याची अंनिसची मागणी
सातारा / प्रतिनिधी :
किल्ले अजिंक्यताऱ्यावर गुरुवारी अघोरी प्रकाराची विद्या केल्याचा प्रकार घडल्याची बाब निदर्शनास आली होती. आज दुसऱ्या दिवशीही किल्याच्या महादरवाजा लगत वाहिलेला गुलाल आणि केंबड्यांची पिसे, दारुची बाटली पडलेली दिसली. गडाच्या परिसरात होत असलेल्या या आघोरी प्रकाराबाबत चिंता व्यक्त होत असून, ऐतिहासिक अशा व पुरोगामी समजल्या जाणाऱ्या साताऱ्याच्या किल्ले अजिंक्यताऱ्यावर करणी, आघोरी प्रथेचा प्रकार घडत असल्याने त्यावर वन विभागाने लक्ष ठेवून, असे कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
किल्ले अजिंक्यताऱ्यावर दुर्गप्रेमी, एतिहासप्रेमी सातारकर दररोज जात असतात. परंतु काही विघ्नसंतोषी मंडळी गडावर व गडाच्या परिसरात आघोरी प्रथा, करणीसारखे, देणगतीसारखे प्रकार करण्यासाठी जातात. गेल्या दोन दिवसापासून गडावर जे आढळून येत आहे. त्यावरुन चिंता व्यक्त होत आहे. अनिष्ट रुढी, परंपरा, अंधश्रद्धेची चळवळ ज्या साताऱयातून सुरु करणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याच साताऱ्यात असे चुकीचे प्रकार होवू लागले आहेत.
गुरुवारी सकाळी गडावर सोललेल्या बकऱ्याची कातडी झाडाला टांगलेल्या अवस्थेत आढळून आली होती. लिंबे, नारळ, हळद, कुंकू, शिजवलेला भात असे विदारक चित्र तेथे अंनिसचे प्रशांत पोतदार यांना पहायला मिळाले. त्यांनी हा करणीचाच प्रकार असल्याचे सांगून संबंधितांवर वनविभागाने कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सकाळी मुख्य दरवाजाच्या बाहेर उजव्या बाजूला उलट्या पंखाच्या कोंबडीची पिसे, दगडाला गुलाल लावलेला व शेजारी दारुची बाटली आढळून आली. हा प्रकार गुरुवारी रात्री झाला असण्याची शक्यता आहे. असे प्रकार किल्ले अजिंक्यताऱ्याच्या परिसरात वाढू लागले आहेत.









