प्रतिनिधी / सातारा :
किल्ले अजिंक्यताऱ्यावर अनेक रहस्य अनेक गुपिते दडलेली आहेत. हा किल्ला पुरातन किल्ला असून अगदी राजा भोज यांच्या काळापासून ते ब्रिटीश काळापर्यंतच्या अख्यायिका ऐकायला मिळतात. गडावर अनेक ऐतिहासिक वास्तू व वस्तूही आढळून आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी लागलेल्या वणव्यामध्ये किल्ले अजिंक्यतारा भक्षस्थानी पडला होता. त्यानंतर अजिंक्यतारा श्रमदान मित्र समुहाच्यावतीने संवर्धन मोहिम राबवत असताना ब्रिटीश कालीन पिलर आढळून आला. त्या पिलरची पाहणी छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी केली.
किल्ले अजिंक्यताऱ्याला ऐतिहासिक महत्व आहे. छत्रपती घराण्यातील प्रत्येक पिढीची पाऊले या गडाला लागलेली आहेत. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचा काही दिवस या गडावर मुक्काम होता. छत्रपती शाहु महाराजांनी तर राजधानीच केली होती. त्यांनी राजसदरेवरुन मराठय़ांना अटकेवर झेंडा फडकवण्याचे आदेशही दिले होते. गडावरील राजसदर आजही त्या इतिहासाच्या आठवणी सांगत उभी आहे. तसेच गडावरील कैदखाना तळी, धान्याचे कोठार, जुने पुरातन मंदिर याही दृष्टीक्षेपात आहेत. परंतु काही बाब अजूनही दृष्टीस पडलेल्या नाहीत. अनेक रहस्य गडावर दडलेली आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी संपूर्ण अजिंक्यताऱ्याला वणवा लागला होता. तो वणवा गडावरही गेला होता. गडावरील गवत व काही झाडे जळली होती. श्रमदानाकरता गेलेले अजिक्यतारा श्रमदान ग्रुपचे जय कदम व करण पवार यांना किल्ला फिरत असताना पुरातन विहीरीच्या ठिकाणी दोन लोखंडी पुरातन पिलर आढळून आले. त्यांनी याची माहिती श्री. छत्रपति शिवाजी महाराज संग्रहालय सातारा चे अभिरक्षक श्री प्रविण शिंदे यांना दिली. शिंदे यांनी प्रत्यक्ष जाग्यावर जावून पहाणी केली. त्या पिलवरवर GAHAGAN AND CO BOMBAY असे लिहलेले आढळले. ही कंपनी साधारण 120 वर्षा पूर्वी मुंबई येथे आस्तीत्वात होती. त्यामुळे हे पिलर साधारण 120 वर्षा पूर्वीचा ब्रिटिश कालीन असावेत व त्याचा वापर टेल लॅम्प लावण्याकरीता किंवा कंपाउंडचा पिलर म्हणून सुद्धा ब्रिटिश काळात केला जात असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला. पिलर दिसत असल्यामुळे ते चोरीला जाण्याची शकता असल्यामुळे प्रविण शिंदे यांनी लगेच निर्णय घेवून अंजिक्यतारा श्रमदान मित्रसमूहाचे जय कदम व करण पवार तसेच संग्रहालयातील कर्मचारी वर्ग यांचे मदतीने ते पिलर काढून घेउन संग्रहालयात आणून जतन करून ठेवण्यात आले आहेत. या लोखंडी पिलरची लांबी 7 फूट असून एकाचे वजन साधारण 300 किलो याहे. किल्यावर अगर कुठेही पुरातन वस्तू आढळल्यास संग्रहालयास संपर्क साधावा, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.









